आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sharad Pawar News In Marathi, Nationalist Congress, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ओबीसींच्या कल्याणासाठी स्वतंत्र मंत्री, शरद पवार यांचे आश्‍वासन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मालेगाव - ‘राज्यात ओबीसी समाजाला ज्या सवलती दिल्या जातात, त्याच सवलती मुस्लिम समाजातील ओबीसींनादेखील दिल्या जातील. त्यामुळे राज्यात ओबीसींच्या योजनांची योग्य प्रकारे अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र मंत्री नियुक्त केला जाईल. जो फक्त ओबीसींच्या कामांकडे लक्ष देईल,’ असे आश्वासन राष्ट्रवादी कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मालेगाव येथील जाहीर प्रचारसभेत दिले.

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र प्रचाराचा शुभारंभ मंगळवारी रात्री मालेगावातील सभेने झाला. या वेळी पवार म्हणाले, आपल्या कृषिमंत्रिपदाच्या काळात शेती क्षेत्रावर लक्ष दिले गेले. परंतु विणकरांकडे जास्त लक्ष दिले गेले नाही. केंद्र सरकारने सात वर्षांपूर्वी टेक्स्टाइल्स पार्क स्कीम आणली. परंतु मालेगावातून एकही प्रस्ताव आला नाही. परिणामी जेथे जास्त यंत्रमागधारक आहेत, त्यांनाच फायदा मिळाला नाही. यासंदर्भात आपल्या तत्कालीन सदस्यांना जाणीवही करून दिली होती. भविष्यात केंद्राचे मालेगावसाठी विशेष बाब म्हणून लक्ष वेधले जाईल. याकरिता तुम्हाला दिल्लीला यावे लागेल.’
सध्या आपण सरकारमध्ये नाही. निवडणुका संपल्यानंतरही तुम्ही आमच्याबरोबर राहा. भविष्यात जो मुख्यमंत्री असेल त्यांच्या माध्यमातून मालेगाव अल्पसंख्याक जिल्हा म्हणून घोषित करण्यासाठी आपण मदत करू, असे आश्वासनही पवारांनी दिले.

अन्याय होणार नाही
बॉम्बस्फोटात मालेगावच्या तरुणांना गोवल्या गेल्याच्या प्रकरणाचाही पवारांनी भाषणात उल्लेख केला. यापुढे मालेगावकरांवर अन्याय तर होणार नाहीच, त्याबरोबरच मालेगावचा चेहरा बदलण्याकरिता प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. छगन भुजबळ यांनी मोदींच्या कृषी धोरणाबद्दल तसेच धार्मिक मुद्द्यांवर होत असलेल्या आक्षेपार्ह बाबींवर टीका केली.

आघाडीविषयी अनभिज्ञता
मालेगावातील शरद पवारांची सभा उत्तर महाराष्ट्रातील प्रचाराचा शुभारंभ समजली जात असली तरी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांतील नेते मात्र सभेत दिसून आले नाहीत. कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीवर पवार व भुजबळ हे दोन्ही नेते सभेत शब्दाने काही बोलले नाहीत.