आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Pawar News In Marathi, Nationalist Congress, Modi, Divya Marathi

मोदी लाटेचा फुगा फुटणार,शरद पवार यांचा विश्वास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - 2004 मध्ये शायनिंग इंडियाचा नारा देऊन भाजपप्रणित राष्‍ट्रीय लोकशाही आघाडी सत्तेवर येईल असे वातावरण निर्माण केले गेले. प्रत्यक्षात, संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या हातात जनतेने चाव्या दिल्या. आताही मोदी लाटेचा फुगा फुगवला जात असला तरी, जनता मात्र, विकासाच्याबाबत आग्रही राहिलेल्या कॉँग्रेस आघाडीलाच संधी देतील व मोदी लाटेचा फुगा फुटेल असा विश्वास राष्‍ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.


पवार यांनी कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या संयुक्त मेळाव्याप्रसंगी मोदींवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, धर्मांध शक्ती वेगळ्या पद्धतीने निवडणूक लढवू पाहात आहे. तुम्ही-आम्ही अनेक निवडणुकांना सामोरे गेलो. प्रत्येक निवडणूक महत्वाचीच असते मात्र या निवडणुकीला वेगळे महत्व आहे. खोटी आश्वासने देणारे फसवे चेहरे रिंगणात आहे. देशात पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करण्याची ही पहिलीच वेळ असून लोकशाहीविरोधातील प्रक्रिया मतदार खपवून घेणार नाही. निवडणुका होतात. मतदार मत देऊन खासदार निवडतात. ज्या पक्षाचे खासदार बहुमताने निवडून येतात त्यांचाच नेता पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारतो. त्यामुळे पंतप्रधानपद होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग लावून बसलेल्यांना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. दुसरी बाब म्हणजे वर्धा येथे भेट देऊन जेथे गांधी तेथे मी असे मोदी यांनी सांगितले. मात्र दुर्दैवाची बाब म्हणजे, देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास ज्यांना माहीत नाही त्यांना सत्ता देण्यासाठी पुढे केले जात आहे. देशाचा कारभार बघू इच्छिणा-यांना इतिहास माहीत नसेल, तर ते काय भविष्य घडवतील असा टोलाही त्यांनी लगावला.


पवार उवाच....
०पूर्वी 86 हजार कोटी रुपयांचे पीक कर्ज दिले जात होते. मात्र आता 80 लाख कोटी रुपयांचे पीक कर्ज दिले जाते.
०पूर्वी शेतकर्जावर 12 टक्के व्याजदर आकारला जात होता. आता 4 टक्के व्याजदराने कर्ज दिले जाते.
०263 दशलक्ष टन धान्य उत्पादन निघत असून 150 दशलक्ष टन धान्य लोकांसाठी वापरले जाते.
०एकेकाळी धान्य आयात करण्याबाबतच्या प्रस्तावावर स्वाक्षरी करताना माझा हात थरथरला व तब्बल दोन रात्र मी झोपलो नाही.
०तांदूळ निर्यातीत भारत प्रथम क्रमांकावर असून त्याखालोखाल गहू व साखर निर्यातीत दुसरा क्रमांक भारताचा येतो असेही त्यांनी सांगितले.