आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Pawar News In Marathi, Nationalist Congress Party, Divya Marathi

शरद पवारांचा नाशकात तळ,मुख्यमंत्र्यांसमवेत 27 मार्चला मेळावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - लोकसभेची एक-एक जागा महत्त्वाची असल्यामुळे प्रचाराची रणनीती ठरवण्यासाठी गुरुवार (दि. 27) व शुक्रवार (दि. 28) असे दोन दिवस केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार नाशिकमध्ये तळ ठोकणार असून, काँग्रेस आघाडीच्या संयुक्त प्रचाराची सभाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत घेतली जाणार आहे.नाशिक व दिंडोरी असे दोन्ही लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. बारामतीनंतर सुरक्षित मतदारसंघ असलेल्या दिंडोरीत पक्षासाठी सर्व परिस्थिती अनुकूल असूनही राष्ट्रवादीचा पराभव झाला. ही पार्श्वभूमी लक्षात घेतली तर दोन्ही जागांवर विजय मिळवण्यासाठी खुद्द शरद पवार यांनीच लक्ष केंद्रित केले आहे.

मध्यंतरी दोन वेळा पवार यांच्या उपस्थितीत मेळावेही होणार होते. मात्र, गारपिटीसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे दौर्‍यात बदल झाले. आता गुरुवारी पवार पुन्हा दौर्‍यावर येणार असून, दुपारी 4 वाजता दादासाहेब गायकवाड सभागृहात मेळावा होणार आहे. त्यास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचीही उपस्थिती असणार आहे. दुसर्‍या दिवशी पवार यांच्या उपस्थितीत दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील वणी येथे सभा होणार आहे.


पूर्वतयारीत मात्र शीतयुद्ध
रंगपंचमीच्या दिवशी काँग्रेस कमिटीमध्ये झालेली बैठकही चर्चेचा विषय ठरली. यात बैठकीच्या प्रास्ताविकात दिंडोरीचे तालुकाध्यक्ष प्रकाश शिंदे यांनी तालुका समित्यांमध्ये कार्यकर्त्यांची वर्णी लागत नाही, असा आक्षेप घेतल्यानंतर वादाचा मुद्दा उपस्थित झाला. मात्र, संपर्कप्रमुख बाळासाहेब थोरात यांनी तातडीने हस्तक्षेप करून त्या विषयावर आता बोलू नका, असे सांगितल्यावर पडदा पडला. दरम्यान, या बैठकीला आमदार माणिकराव कोकाटे यांची अनुपस्थिती तसेच जिल्हा परिषद सदस्यांनीही केवळ हजेरीच लावल्याचाही विषय चर्चेचा ठरला.


दिलजमाईसाठी प्रयत्न
नाशिक लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष मागील काळात रंगला आहे. पालकमंत्री छगन भुजबळ, खासदार समीर भुजबळ विरुद्ध काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे व निर्मला गावित असेही वाद झाले. या पार्श्वभूमीवर उभयतांचे मनोमिलन करण्यासाठी संयुक्त मेळावा महत्त्वाचा ठरणार आहे.