आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकर्‍यांना कांद्यातून अधिक पैसे मिळाले तर व्यापार्‍यांच्या पोटात का दुखतं - शरद पवार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - देशात सध्या साठ टक्के शेतकरी असून ते टिकले तरच तुमची कारखानदारी टिकेल. शेतकर्‍यांना त्यांच्या घामाचा पैसा मिळाला तरच तुमच्या चारचाकी गाड्याना किंमत मिळेल. शेतकर्‍यांना कांद्यातून अधिक पैसे मिळाले तर तुमच्या (व्यापार्‍यांच्या) पोटात का दुखतं, असा सवाल करत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी नाशकातील मेळाव्यात शेतकर्‍यांची बाजू घेतली.
कादवा सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीचे पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, दिल्लीसह देशातील प्रमुख शहरांत कांद्याचे दर वाढले होते. त्या वेळी दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी नाशिकमधून कांदा स्वस्त करण्याची विनंती केली होती. तसेच आपली खुर्ची जाण्याची भीतीही व्यक्त केली होती. मात्र शेतकर्‍यांना कायम पैसा मिळत नसल्याचे आपण त्यांना स्पष्टपणे सांगितले होते. पाच वर्षांपूर्वी भारतात गहू आयात करण्याची वेळ आली होती. मात्र गेल्या वर्षापासून देशाचा कोटा पूर्ण करून तो निर्यात होईल एवढ्या प्रमाणात साठा उपलब्ध असल्याचे सांगितले. देशाच्या अन्न सुरक्षा योजनेसाठी सर्वात मोठे योगदान शेतकर्‍यांचे असल्याने त्यांच्या कष्टावरच ही योजना यशस्वी होणार आहे. उसाचे क्षेत्र कमी होत असल्यामुळे साखरेवरही त्याचा परिणाम होत आहे. मात्र शेतकर्‍यांनी उसामध्ये आंतरपीक घेऊन अधिक क्षेत्र वाढवले पाहिजे. तसेच उसाला व इतर पिकांना पाण्यासाठी ठिबक सिंचनचा अधिकाधिक वापर करता यावा यासाठी ठिबक सिंचनवरील सबसिडीमध्ये वाढ करण्याचा प्रयत्न करणार आहे. सध्या शिक्षित तरुणामुळे कृषीमध्ये देशाचे नाव जगामध्ये घेतले जात असल्याने तरुणांनी संशोधक पद्धतीने शेती करण्याचा
सल्ला त्यांनी या वेळी दिला.
पवार साहेब प्रश्न सोडवतात
कांद्याची आयात-निर्यात करणे हे काही कृषी मंत्रालयाचे काम नाही. ते वाणिज्य मंत्रालयामार्फत चालते. त्या मंत्र्याचे नावही बर्‍याच जणांना माहीत नाही. मात्र, पवार साहेब प्रश्न सोडवतात म्हणून दर वाढले तरी पवार आणि दर कमी झाले तरी पवार. त्यामुळे त्यांच्या बंगल्यावर किंवा कार्यालयात फक्त शेतकरीच नाही तर शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसपासून सर्वच जण येत असल्याचे भुजबळांनी सांगताच उपस्थितांमध्ये चलबिचल सुरूझाली होती.