आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गांधी हत्येने गांधी विचारांची चिकीत्सा पूर्णपणे थांबली, शेषराव मोरे यांनी व्‍यक्‍त केली खंत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जेव्हा महात्मा गांधीचा प्रभाव कमी होत होता. त्यांची लोकप्रियता ओसरत चालली होती अशावेळी त्यांची हत्या करण्याची घोडचूक स्वातंत्र्यवीर सावरकारांसारखा राजकारणी, दृष्टा नेता का करेल असा सवाल प्रख्यात अभ्यासक व सावकरवादी विचारवंत प्रा. शेषराव मोरे यांनी केला. गोडसेच्या भ्याड कृत्यामुळे हिंदू महासभा संपली, मुस्लीमांना आरोपाचे कायमचे हत्यार मिळाले. असेही मोरे म्हणाले. न्यायालयाने सावरकांना निर्दोष सोडल्यानंतर पंडीत नेहरुंच्या नेतृत्वातील तत्कालीन काँग्रेस सरकारने त्या विरुद्ध कधीच अपील का केले नाही. असा प्रश्नही मोरे यांनी उपस्थित केला.

दिव्य मराठी लिटरचेर फेस्टीव्हलमध्ये शनिवारी अखेरच्या सत्रात प्रा. मोरे यांची दिव्य मराठीचे राज्य संपादक प्रशांत दीक्षित, बालाजी चिरडे यांनी प्रकट मुलाखत घेतली. त्यात मोरे  यांनी अनेक कादपत्रांचा दाखला देत, तसेच काही महत्वाची पत्रे वाचवून दाखवत म्हणाले की,  गांधी हत्येनंतर गांधी वादाची चिकीत्सा करणे पूर्णपणे थांबले. मुस्लीमांना कायमचे सरंक्षण मिळाले. जी विचारधारा सावरकरांनी उभी केली होती. ती पूर्णपणे संपली. आपण गांधी हत्या केली तर ते हुतात्मा होतील याची जाणीव सावरकरांना नव्हती असे म्हणता येत नाही.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे न्यायालयाने संशयाच्या नव्हे तर पुराव्या अभावी सावरकरांना निर्दोष मुक्त केले. त्यावेळी काँग्रेसचे सरकार होते. मात्र या सरकारने न्यायालयाच्या निर्ण्याविरुद्ध कधीच अपील केले नाही. जीवनलाल कपूर आयोगाच्या निष्कर्षांतही गांधी हत्येसाठी सावरकर दोषी असल्याचे म्हटले नाही. मात्र त्यात एक वाक्य सावरकरांकडे अंगुली निर्देश करणारे घुसडून दिले आहे. आयोगासमोर सादर झालेले सावरकर विरोधी पुरावे बनावट असल्याचे स्पष्ट झाल्याचे मोरे यांनी सांगितले.

खरे म्हणजे भारताची फाळणी होणार  पाकिस्तानला ५५ कोटी द्यावे लागणार हे १९४० पासूनच निश्चित झाले होते. तशी  तयारीही सगळ्यांनी केली. त्यामुळे यासाठी गांधी हत्येचा कट सावरकर रचतील असे म्हणणे तथ्यहिन आहे. कपूर आयोगासमोर सावरकरांची बाजू आलीच नाही. न्यायालयासमोर माफीचा साक्षीदार झालेल्या दिंगबर बडगेला आयोगाने पाचरण केले नाही. कारण तो न्यायालयासमोर दिलेली साक्ष पोलिसांच्या दबावाखाली दिली असल्याचे सांगणार होता, असेही मोरे म्हणाले. यावेळी निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते मोरे यांचा सत्कार करण्यात आला तर राजहंस प्रकाशनाचे सदानंद बोरसे यांनी चिरडे यांचा सत्कार केला.
 
कपूर आयोग : दिल्ली मुंबई पोलिसांचे भांडण
कपूर आयोगाची स्थापना मुळात गांधी हत्येत सावरकर दोषी आहेत की नाही हे ठरवण्यासाठी नव्हतीच मात्र त्यावेळच्या परिस्थिती, दबावामुळे आयोगाने कार्यकक्षेची मर्यादा ओलांडत सावरकरांकडे बोट दाखवले. खरे तर न्यायालयाने निर्दोष सोडलेल्या व्यक्तीवर ठपका ठेवण्याचा कोणताही अधिकार आयोगाला नाही. गांधी हत्या दिल्लीत झाली त्याचा गु्न्हा दिल्लीत नोंदवण्यात आला होता. आरोपी मुंबईचे असल्यामुळे  तपास मुंबई पोलिस करीत होती. त्यामुळे आयोगासमोर सुनावणी झाली तेव्हा साक्षी पुरावे तपास यावरुन दिल्ली आणि मुंबई पोलिसांच्या वकीलांमध्ये  भांडणे सुरू होती.
 
शेषराव मोरे यांच्या अभ्यासातील मुद्दे
- सावरकरांचा बुद्धिवाद कसा नकली आहे, ते मनुवादी कसे होते असा विपर्यास करणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून पुस्तक लिहिले.
- १९९८ ला वाजपेयींचे सरकार आल्यानंतर विरोधकांनी सावरकरविरोधी मोहीम अधिक तीव्र केली.
- भाजपला विरोध करायचा असेल तर सावरकरविरोधी भूमिका घेण्याचे धोरण भाजप विरोधकांनी अवलंबले.
- सावरकरांना न्यायालयाने संशयाचा फायदा म्हणून नाही तर पुरावे नव्हते म्हणून निर्दोष सोडले.
- माफीचा साक्षीदार दिगंबर बडगे याने स्वतःला वाचवण्यासाठी सावरकरांवर तथ्यहीन आरोप केले.
- सावरकरविरोधी काँग्रेस सरकार आणि पंडित नेहरू असताना यापैकी कुणीही सावरकर यांच्या विरोधात खटला भरण्यासाठी पुढे आले नाही.
- गांधी हत्येत गुन्हेगार म्हणून सावरकरांचे नाव समाविष्ट करावे याचा निर्णय सरदार पटेल यांच्या हातात नव्हताच.
- कपूर आयोगाच्या माजी न्यायाधीशांनी न्यायतत्त्व पाळलेच नाही, त्यांनी अग्राह्य, बनावट, निरर्थक पुरावे पुढे आणले.
- आयोग काय बेबनाव करू शकतो याच्या अभ्यासासाठी कपूर आयोगाचा अभ्यास पुरेसा.
- सावरकर कधीही हिंसक मार्ग चोखाळणारे नव्हते, तर ते कवीमनाचे होते
- सावरकर आपल्या लिखाणात नेहमी महात्मा गांधीजी असे लिहून आपला आदर व्यक्त करीत.
- नथुराम गोडसे हा सावरकरांचा सांगकाम्या नव्हता, तो नेहमी त्यांच्यावर टीका करायचा.
 
शेषरावांनी उपस्थित केलेले ५ तार्किक प्रश्न
१.  गांधीजींची हत्या करून सावरकरांना स्वतःला आरोपी सिद्ध करायचे होते का?
२. गांधी हत्येची कारणमीमांसा करण्यासाठी नथुराम गोडसे स्वतः पुढे आला. गोडसे हा सावरकरांचा अनुयायी आहे असा जनतेचा समज असताना गांधीजींच्या हत्येचा कट रचून सावरकर स्वतः आरोपी कसे होतील?
३. गांधीजींची हत्या का केली असेल याची कारणेही सापडत नाहीत. मग सावरकर कुठल्या आधारावर आरोपी ठरतात?
४. गांधीजींचा प्रभाव कमी होण्याचा काळ असताना त्यांची हत्या सावरकर का करतील?
५. गांधी हत्येनंतर हिंदू महासभा संपेल, गांधींवरील टीका संपेल याची जाणीव असताना गांधी हत्येसारखा अविचार कसा करतील?
बातम्या आणखी आहेत...