आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेची तुतारी नाशकातून

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शिवसेनेतील स्थानिक पातळीवर नाराजी दूर झाल्यानंतर सचिव विनायक राऊत यांनी नगरसेवकांच्या मदतीने शिवसेनेच्या महाअधिवेशनाच्या तयारीला सुरुवात केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार डोंगरे वसतिगृह मैदान महाअधिवेशनासाठी मुक्रर केले आहे. सूत्रांनुसार या अधिवेशनात 2014 मध्ये होणार्‍या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून रणनीती ठरविली जाणार आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची मोट पुन्हा नव्याने बांधण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अनेक विभागांमध्ये अंतर्गत बंडाळीचे पीक उभे राहिले आहे. यावर औषधोपचार करण्याचे आव्हान असताना ठाकरे यांनी नाराजांना थेट पक्षाबाहेरचा रस्ता दाखवून शिवसेनेचा बाणा कडवा असल्याचे दाखवून दिले. दरम्यान, नाशिकमध्ये माजी महानगरप्रमुख व जिल्हाप्रमुखांनी बंडाचा झेंडा पुकारला होता. प्रतिशिवसेना चालवण्याचेही प्रयत्न घडले. मात्र, ठाकरे यांनी कडवी भूमिका घेतल्यामुळे बंडखोरांना पक्षांतराशिवाय पर्यायच उरला नाही. त्यानंतर ठाकरे यांनी मातोर्शीवर बोलावून सर्व पदाधिकारी व नगरसेवकांची झाडझडती घेतली. सर्वांनी एकदिलाने काम करण्याची ग्वाही दिल्यानंतर आता ठाकरे यांनी नाशिकमधील महाअधिवेशनाच्या तयारीला लागण्याचे आदेश दिल्याचे समजते.

या आदेशानुसार शिवसेनेचे सचिव विनायक राऊत यांनी नगरसेवक अजय बोरस्ते, डी. जी. सूर्यवंशी, सचिन मराठे, विलास शिंदे यांच्यासह मध्यंतरी डोंगरे वसतिगृह मैदानाची पाहणी केली. मागील अधिवेशन पंचवटीमधील आर. पी. विद्यालयाच्या मैदानावर झाले होते. मात्र, शिवसेनेची व्याप्ती वाढल्यामुळे तसेच राज्यभरातून मोठय़ा संख्येने शिवसैनिक येणार असल्यामुळे डोंगरे वसतिगृह मैदानावर एकमत झाले. नाशिकमध्ये झालेले मागील अधिवेशन शिवसेनेसाठी लाभदायी ठरून 1995 मध्ये युतीचा भगवा महाराष्ट्रावर फडकला होता. त्यामुळे नाशिकमधील दुसरे अधिवेशन दणदणीत भरविण्यासाठी पदाधिकारी तयारीला लागले आहेत.