आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शीतल महाजनने तरुणाईसह पालकांना दिला यशस्वी जीवनाचा कानमंत्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- प्रत्येक प्रश्नाला उत्तर असतेच. मात्र, त्यासाठी प्रत्येकाने सकारात्मक विचार केला पाहिजे. आयुष्यातील कठीण प्रसंगी येणार्‍या आव्हानांमध्ये मोठय़ा संधी दडलेल्या असतात. या संधींचे सोने करण्यासाठी आव्हानांचा अखेरपर्यंत पाठलाग केला पाहिजे. या संघर्षात सातत्य ठेवल्यास यशाला गवसणी घालता येते, असा सल्ला यशाचे उच्च शिखर गाठणार्‍या आणि पद्र्मशी पुरस्काराने सन्मानित शीतल महाजन यांनी तरुणांना दिला.
दादासाहेब गायकवाड सभागृहात रविवारी तिसर्‍या वेध व्यवसाय प्रबोधन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. तरुणांना मार्गदर्शन करताना महाजन बोलत होत्या. वेध व्यवसाय प्रबोधन परिषदेचे संकल्पना असलेल्या डॉ. आनंद नाडकर्णी यांनी महाजन यांच्याशी संवाद साधला. या प्रसंगी वंदना अत्रे, वैशाली बालाजीवाले, यांच्यासह वेधचे स्वयंसेवक आणि विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
शीतल महाजन या वयाच्या 23 व्या वर्षी कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर उणे 40 अंश तपमानात ‘फ्री फॉल पॅरा जम्पिंग’ करणारी जगातील पहिली महिला ठरल्या आहेत. महाजन यांनी आतापर्यंत 265 वेळा देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. यशाचे उच्च शिखर गाठणार्‍या महाजन यांना पद्र्मशी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
महाजन पुढे म्हणाल्या की, जीवनात यशस्वी होण्यासाठी सकारात्मक विचाराला खूप महत्त्व आहे. माणसाने कठीण प्रसंगामध्ये खचून न जाता, संघर्ष करून त्यातून मार्ग काढत राहिले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला. उद्योजक हनुमंतराव गायकवाड यांनी कौशल्याधारित शिक्षण काळाची गरज असल्याचे सांगितले.
पालकत्व निभावण्याचे आव्हान
मुलांवर चांगले संस्कार घडविण्याची मोठी जबाबदारी पालकांवर असते. पाल्यांकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ पालकांकडे नसतो. त्यामुळे हे पालकत्व निभावण्याचे आव्हान पालकांसमोर आहे. चांगले व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी पालकांनी मुलांवर अलगदपणे संस्कार केले पाहिजे, असे आवाहन क्रीडा मानसतज्ज्ञ भीष्मराज बाम यांनी पालकांना केले. परिषदेच्या प्रारंभी डॉ. आनंद नाडकर्णी यांनी तयार केलेल्या ‘या मुलांशी वागावं तरी कसं’ या डीव्हीडीचे बाम यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.