आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena BJP News In Marathi, Lok Sabha Election, Aurangabad, Divya Marathi

निवडणुकीचा आखाडा: दोघांत तिसरा असल्याचा सेना-भाजपला संशय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शिवसेना आणि भाजपमध्ये कोणताही गैरसमज नसल्याचे स्पष्ट करतानाच गैरसमज निर्माण करण्यासाठी तिसराच घटक कार्यरत असल्याचा संशय राज ठाकरे यांचा नामोल्लेख टाळून युतीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. या वेळी लोकसभा प्रचार समन्वय समितीची स्थापना करण्यात आली.


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा असेल, असे सांगत राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी राजकीय वतरुळात खळबळ उडवून दिली होती. शिवसेनेची मते खाण्यासाठीच राज यांनी ही खेळी केल्याचे बोलले जात होते. त्यामुळे भाजपचे दिंडोरीतील खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या विरोधात आमदार धनराज महाले यांनी उमेदवारीची तयारी सुरू केल्याची चर्चा होती. नाशिकमध्येही भाजपचे पदाधिकारी शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी फिरत नसल्याची टीका सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपच्या निवडक पदाधिकार्‍यांच्या गुरुवारी हॉटेल एमरल्ड पार्कमध्ये झालेल्या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले होते. परंतु, आमची मने दुभंगलीच नाहीत; तर मनोमिलनाचा प्रश्नच येत नाही, असे सांगत या बैठकीत कथित वादावर पडदा टाकण्यात आला. शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष 30 वर्षांपूर्वी विचारांनी एकत्र आले असल्याचे सांगत शिवसेनेचे संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांनी महायुतीच्या एकोप्याची भलावण केली. भाजपचे संपर्कमंत्री डॉ. राजेंद्र फडके यांनीही या एकोप्याला दुजोरा देत ज्या ठिकाणी शिवसेनेला भाजपच्या नेत्यांची वा कार्यकर्त्यांची गरज पडेल, तेथे ते उपलब्ध होतील, तसेच दिंडोरीतही शिवसैनिक आमच्याबरोबर असतील, असे स्पष्ट केले.


दिंडोरी मतदारसंघातही समन्वय
या बैठकीच्या दरम्यान पत्रकार परिषद घेत दिंडोरीतील वाद हा या दोन्ही पक्षांनी नाही, तर बाहेरच्या लोकांनी तयार केला असल्याचे भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांनी सांगितले. गारपीटग्रस्त भागाला भेटी देण्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांना बैठकीस उपस्थित राहण्यास विलंब झाला आणि याच वेळी मुंबईतून अचानक बोलविण्यात आल्याने उर्वरित पदाधिकारी स्थानिक बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत, असाही खुलासा त्यांनी केला. दोन्ही पक्षांमध्ये समन्वय आधीपासूनच असून, शिवसेना, भाजप आणि रिपाइं हे तिन्ही पक्ष एकसंधपणे प्रचारकार्यात सहभागी होतील, असे सांगतानाच प्रचाराची रणनीती ठरविण्यासाठी समन्वय समितीची स्थापना करण्यात आल्याचे पदाधिकार्‍यांनी सांगितले. या वेळी युतीचे नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे, दिंडोरीतील उमेदवार हरिश्चंद्र चव्हाण, शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, उपमहापौर सतीश कुलकर्णी, महापालिकेतील विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर, माजी महापौर बाळासाहेब सानप, विजय साने, सीमा हिरे, प्रकाश लोंढे, पवन क्षीरसागर आदी उपस्थित होते.