आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena Candidate, Latest News In Divya Marathi

नाशिक लोकसभेसाठी शिवसेना उमेदवाराची घोषणा दोन दिवसांत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- राष्ट्रवादी कॉँग्रेसपाठोपाठ आता शिवसेना दोन दिवसांत आपला नाशिक लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार जाहीर करणार आहे. यासंदर्भात शनिवारी नाशिकच्या शिवसेनेतील मोजक्याच पदाधिकार्‍यांशी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चर्चा करून आपण देऊ त्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी उपस्थित पदाधिकार्‍यांवर टाकली. त्याचबरोबर नाशिकमध्ये स्थायी समितीवरून गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या राजीनामा सत्राचाही त्यांनी खरपूस समाचार घेत पक्षाविरुध्द काम करणार्‍यांना घरचा रस्ता दाखविण्याचा इशारा दिला.
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांचे नाव जाहीर केल्यानंतर तितक्याच तुल्यबळाचा प्रतिस्पध्र्यांचा उमेदवार कोण? याकडे लक्ष लागून आहे. त्यानुसार शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिकमधून मोजक्या पदाधिकार्‍यांसह इगतपुरी, त्र्यंबक, नाशिक व सिन्नर येथील तालुकाप्रमुखांना बोलावणे धाडले होते. बैठकीत त्यांनी यापूर्वी दिलेल्या सूचनांचे स्मरण देत आपण देऊ त्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी तुमच्यावर सोपवत असल्याचा पुनरुच्चार केला. त्यावर उपस्थितांनी होकार दर्शवित आदेश शिरसावंद्य मानला. यानंतर उद्धव यांनी नाशिकचे संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर, आमदार तथा उपनेते बबनराव घोलप यांच्यासह दोन्ही इच्छुक उमेदवार जिल्हाप्रमुख विजय करंजकर आणि हेमंत गोडसे यांच्याशी बंद दरवाजाआड गुप्तगू केली. या चर्चेतही त्यांनी देईल त्या उमेदवारासाठी काम करणे मंजूर आहे का, अशी विचारणा करत इच्छुकांकडून शब्द सोडवून घेतला. बैठकीस महानगरप्रमुख अजय बोरस्ते, मनपा विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, उपजिल्हाप्रमुख जगन आगळे, निवृत्ती जाधव, माजी आमदार शिवराम झोले यांच्यासह तालुकाप्रमुख निवृत्ती लांबे (त्र्यंबकेश्वर), प्रकाश म्हस्के (नाशिक), हरिभाऊ गायकर, (सिन्नर), केशव पोरजे व सुभाष गायधनी, महेश बिडवे (नाशिक) हे उपस्थित होते.