आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वहीत, गटबाजी अन् अधोगती..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी किंवा आपआपसांतील मतभेदांवरून निर्माण झालेल्या वादांसाठी आजवर संपर्कप्रमुखालाच जबाबदार धरण्यात आले आहे. यामुळेच यापूर्वीच्या संपर्कप्रमुखांना नाशकातून काढता पाय घ्यावा लागला. यानंतर त्यांच्या जागी रवींद्र मिर्लेकर यांची नियुक्ती झाली. मिर्लेकर यांच्या नियुक्तीनंतर तरी गटबाजी कमी होईल, अशी अपेक्षा शिवसैनिकांकडून केली गेली. येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता याकडे अधिक गांभीर्याने पहावे लागेल.

राज्यभर कांद्याचे निर्यातमूल्य आणि उसाला हमीभाव या दोन मुद्यांवरून रण गाजत आहे. ते पाहता खरेतर आगामी निवडणूक लक्षात घेऊन शिवसेनेने याप्रकरणी आंदोलन करत उत्पादक, शेतकर्‍यांची बाजू प्रकर्षाने मांडणे गरजेचे होते. तथापि, प्रत्यक्षात तसे काहीच घडले नाही. मध्यंतरी मिर्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील काही निवडक तालुक्यांमध्येच शिवसेनेचे मेळावे झाले आणि त्यांनाही जेमतेमच प्रतिसाद मिळाला. तीन दिवसांचा दौरा केवळ दोनच दिवसांत आवरता घ्यावा लागला.

विजय करंजकर यांच्या गळ्यात जिल्हाप्रमुखपदाची माळ पडली. ते ज्या भूमीतले त्या ठिकाणची पारंपरिक सत्ता त्यांच्या हातून निसटली. करंजकर यांच्या सौभाग्यवती या नासाकाच्या पदाधिकारी राहिलेल्या आहेत. त्यामुळे नाशिक तालुक्यात झालेल्या मेळाव्याच्या निमित्ताने काही शेतकर्‍यांनी करंजकरांना नाशिक साखर कारखाना बंद पडण्यामागची कारणेही विचारली. त्याचे पुढे काय झाले हे सर्वर्शुत आहेच. तर आगामी लोकसभा आणि त्यापाठोपाठ येणार्‍या विधानसभा निवडणुका पाहता प्रत्येक तालुक्यात कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी करणे गरजेचे असताना सिन्नरसारख्या तालुक्याला सहा-सहा महिने तालुकाप्रमुख मिळू नये, यापेक्षा दुर्दैव ते कोणते! सिन्नर हा एकेकाळचा शिवसेनेचा बालेकिल्ला. आज त्या ठिकाणी कॉँग्रेसचे स्थान मजबूत झाले आहे. महत्त्वाची आंदोलने सोडून एचएएलसारख्या ठिकाणी जिथे आधीच मनसेने आंदोलन करत कब्जा केला, त्या ठिकाणी जाऊन शिवसेनेने केवळ निवेदन देण्याची भूमिका पार पाडली. तसे पाहिल्यास निफाड तालुका ज्यांच्या कार्यकक्षेत येतो, ते कारभारी आहेर यापासून दूरच राहिले. यामुळे हे आंदोलन केवळ दिखावाच ठरले.

लोकसभेच्या अनुषंगाने विचार केला तर गेल्या महिन्यापर्यंत हेमंत गोडसे सोडल्यास शिवसेनेला उमेदवाराचे नाव सापडत नव्हते. मात्र, आता परिस्थिती बदलू लागल्याने अनेकांच्या तोंडाला उमेदवारीचे पाणी सुटू लागले आहे. यानंतर येणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठी सिन्नर आणि येवला तालुक्यासाठी शिवसेनेकडे उमेदवार नाही. केवळ नाशिकरोड आणि नाशिक शहर केंद्रित शिवसेनेचा कारभार सुरू असल्याने ग्रामीण भागात पक्षाची अवस्था दयनीय आहे. जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख ही पदे नाशिकरोडला. आता आणखी एका माजी पदाधिकार्‍याला संपर्कप्रमुख हे पद देण्याच्या हालचाली सुरू आहेत. सुनील बागुल राष्ट्रवादीत गेल्यानंतर त्यांची उणीव भरून काढेल, असे नेतृत्व मिळालेले नाही. माजी नगरसेवक भगवान भोगेंसारख्यांना अडगळीतच टाकले असून नाशिकरोडमधील श्याम खोलेसारख्या कार्यकर्त्याला अन्य पक्षाचा विचार का करावा लागतो, हे शोधण्याची कधी स्थानिक नेतृत्वाला गरज वाटली नसावी. म्हणूनच अनेक नाराज असूनही सर्व मुकाट्याने सहन करत आहेत, ते मजबूरी म्हणून नव्हे, तर केवळ पक्षाच्या प्रेमापोटी.