आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाकरेंचा आदेश; गटबाजांसाठी संदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक लोकसभा मतदारसंघातील लक्षवेधी लढतीत राष्ट्रवादीकडून संभाव्य चेहरा म्हणून विद्यमान खासदार समीर भुजबळ यांनाच संधी मिळेल, असे संकेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्यानंतर शिवसेनेच्या गोटात झपाट्याने हालचाली सुरू झाल्या. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिकमध्ये येऊन नुसती बैठक घेतली नाही, तर उमेदवारीसाठी दोन गटांत सुरू असलेल्या वादाचा अप्रत्यक्षपणे खरपूस समाचार घेतला. शिवसेनेतील ‘आदेश’ संस्कृतीच यापुढे अंमलात राहील, असे सांगत महानगरप्रमुखपदाला पुनर्जीवित करीत संघटनात्मक बांधणीच्या दिशेने त्यांनी पुढचे पाऊल टाकले.

नाशिक लोकसभा मतदारसंघात कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेचा झेंडा फडकवायचा असा निर्धार ठाकरे यांनी गेल्या मेळाव्यातच जाहीर केला. भुजबळांच्या इशार्‍यावर शिवसेना चालते, या आरोपांना खोडून त्यांचाच पराभव करून दाखवा, असे आव्हान त्यांनी दिले होते. त्यामुळे राष्ट्रवादीकडून संभाव्य उमेदवाराचा चेहरा जाहीर करण्याचे संकेत दिल्यावर ठाकरे यांनीही महत्त्वाचे पाऊल उचलले.

निवडक शंभरात आमदार, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व तळाकडील संघटनांना सामावून घेत झालेल्या बैठकीत ठाकरे यांनी एक गोष्ट स्पष्ट करून टाकली, ती म्हणजे शिवसेनेत कोणीही उमेदवारीसाठी दावेदार नाही वा कोणताही गट उमेदवार ठरवू शकणार नाही. त्याचे स्पष्टीकरण देताना त्यांनी लोकशाही तत्त्वावर सर्वांना विचारून यापूर्वी ज्यांना उमेदवारी दिली त्या दशरथ पाटील व दत्ता गायकवाड यांचा गटबाजीमुळे कसा पराभव झाला, याकडे लक्ष वेधले. त्यातून त्यांनी शिवसेनेत सध्या उमेदवारीवरून पडलेल्या दोन गटांनाही लक्ष्य केले. आजघडीला मनसेतून शिवसेनेत आलेले नगरसेवक हेमंत गोडसे व जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. या दोघांनाही शिवसेनेतील दोन गटांकडून उमेदवारीच्या स्पर्धेत रसद पुरवली जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पुन्हा यातील एकाची उमेदवारी जाहीर झाली तर दुसर्‍या गटाच्या पडद्यामागील बंडखोरीचा फटका शिवसेनेला बसू शकतो, हे उद्धव यांनी बरोबर ओळखले. त्यातून त्यांनी ‘आदेश’ संस्कृतीची आठवण करून देत ‘उमेदवार फक्त मीच ठरवेल,’ असे जाहीर केले. दुसरीकडे उमेदवार कोण असेल, हे त्यांनी सांगितले नाही. मात्र, प्रचारासाठी आमदार बबनराव घोलप, विजय करंजकर व हेमंत गोडसे यांना तयारीही करण्यासाठी सांगितले. यात गोडसे यांना जिल्हा संघटकासारखे पद दिल्यामुळे नवीनच प्रश्न निर्माण झाला. संघटकपदाच्या रूपातून गोडसे यांना उमेदवारीच्या दिशेने पुढे ढकलले की, उद्या आपल्याच ‘आदेशा’प्रमाणे ऐनवेळी दुसर्‍याला संधी दिली तर गोडसे यांना महत्त्वाचे पद दिल्याचे सांगता येईल, असे सांगण्याची तजवीज ठाकरे यांनी केली. तशी व्यवस्थाही निर्माण करून ठेवली. या सर्वांत महत्त्वाचे म्हणजे उमेदवार कोण, यापेक्षा संघटनात्मक बांधणीसाठी महानगरप्रमुखपद पुनर्जीवित करण्याचा निर्णय महत्त्वाचा ठरला.

दोन वर्षांपासून हे पद रिक्त असल्यामुळे शिवसेनेची पीछेहाट होत असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे संघटना मजबूत व एकसंध असल्याशिवाय विजयाची गणिते जुळवता येणार नाहीत, हे ओळखून त्यांनी महानगरप्रमुख व महिला शहर संघटक या दोन्ही पदांवरील संभाव्य चेहरेही अधोरेखित केले. अर्थात, त्याची औपचारिक घोषणा बाकी असली तरी महानगरप्रमुखपदाची धुरा पुन्हा अजय बोरस्ते यांच्या खांद्यावर देण्याचे संकेतही त्यांनी दिले. थोडक्यात, ठाकरे यांनी एकाच दगडात अनेक पक्ष्यांची शिकार तर केलीच, शिवाय गटबाजीवर वेळीच मलमपट्टी करून संघटनेचा प्रभाव वाढवण्याच्या दिशेने पाऊलही टाकले.