आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गटबाजीचा धसका; अखेर कार्यकारिणीची घोषणा, शिवसेना महानगरप्रमुखाविना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- मुंबई, ठाणे व औरंगाबादपाठोपाठ शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणार्‍या नाशिक शहराची कार्यकारिणी वर्षभरानंतर का होईना जाहीर करण्यासाठी पक्षश्रेष्ठींना मुहूर्त मिळाला. परंतु, पक्षातील गटबाजीचा धसका घेत महानगरप्रमुखाविनाच ही कार्यकारिणी घोषित करण्यात आली. संपर्कनेते रवींद्र मिर्लेकर यांच्या सूचनेनुसार जिल्हाप्रमुखांनी सादर केलेल्या कार्यकारिणीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिक्कामोर्तब केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

गेले दशकभर महापालिकेत सत्ता उपभोगणार्‍या आणि एकेकाळी आमदार व खासदारकी ज्या पक्षाकडे होती, त्या शिवसेनेसारख्या पक्षाला महानगरप्रमुखपदी सर्वसंमतीने एकही उमेदवार भेटला नसल्याने हे पदच गोठविण्याची वेळ पक्षावर आली आहे. दीड वर्षापूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेची सत्ता मनसेने हिसकावून घेतल्यानंतर पक्षश्रेष्ठींनी तत्कालीन कार्यकारिणी बरखास्त केली होती. त्यानंतर तब्बल आठ महिन्यांनंतर जिल्हाप्रमुखपदी विजय करंजकर यांची निुयक्ती पक्षाकडून करण्यात आली आहे. मात्र, करंजकर यांनाही एका गटाने विरोध करीत समांतर शिवसेना चालविण्याचा प्रयत्न करताच त्यांना थेट पक्षातूनच बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. यामध्ये माजी जिल्हाप्रमुख सुनील बागुल, अर्जुन टिळे यांच्यासह महिला आघाडीच्या शोभा मगर यांच्यासह त्यांच्या सर्मथकांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश करून वेगळी चूल मांडली. त्यामुळे शिवसेनेच्या शहर व जिल्हा कार्यकारिणीची निवड पुन्हा लांबणीवर पडली. त्यानंतर संपर्कनेतेपदी पुन्हा मिर्लेकर यांची नियुक्त होताच त्यांनी पक्षातील गटबाजी दूर करून पदाधिकार्‍यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच भाग म्हणून गेल्या वर्ष-दीड वर्षापासून प्रलंबित कार्यकारिणीलाही त्यांच्या प्रयत्नामुळेच मुहूर्त मिळाल्याचे बोलले जात आहे. परंतु, त्यांनीही पक्षातील गटबाजीचा धसका घेत महानगरप्रमुखपदी कोणाचीही घोषणा केल्यास कुठला तरी गट नाराज होऊन पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण होईल, ही शक्यता पक्षप्रमुखांकडे व्यक्त करीत कार्यकारिणी घोषित करण्यात आली. यामध्येही सद्यस्थितीत पक्षात असलेल्या सिडको विरुद्ध गंगापूररोड ते नाशिकरोड असे वेगवेगळे गट निर्माण झालेले असले तरी त्यांना विश्वासात घेऊन सर्वसंमतीने नियुक्त्या करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.