आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena News In Marathi, Nashik Lok Sabha Constituncy, Divya Marathi

एकत्रित आले, पण संधिसाधूंचा धोका शिवसेनेला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - लोकसभा निवडणुकीच्या कटू इतिहासाकडे दुर्लक्ष करीत कधी नव्हे ते शिवसेनेचे पदाधिकारी यंदा त्यांच्याच उमेदवाराच्या पाठीशी एकदिलाने उभे राहिले आहेत. अर्थात, त्यातही काही संधिसाधू पुढारी असे आहेत की, जे केवळ पक्षश्रेष्ठी येताच हिरिरीने हजेरी लावतात, प्रचारात मात्र त्यांचे अस्तित्व नसते. अशा संधिसाधूंच्या हालचालींवर लक्ष ठेवत सध्याचे वातावरण टिकवून ठेवण्याचे आव्हान शिवसेनेसमोर उभे ठाकले आहे.


शिवसेनेच्या अवसानघातकी पदाधिकार्‍यांमुळे गेल्या दोन लोकसभा निवडणुका चर्चेत राहिल्या होत्या. 2004 च्या निवडणुकीत दशरथ पाटील यांच्या विरोधात सेनेतील तत्कालीन दिग्गजांनीच दंड थोपटल्यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर 2009 मध्ये झालेल्या निवडणुकांमध्येही दत्ता गायकवाड यांच्या विरोधात स्वकीयांनीच छुपे बंड केले होते. परिणामत: गायकवाड यांना तिसर्‍या स्थानावर समाधान मानावे लागले होते. यंदा मात्र प्रथमच लोकसभा निवडणुकीत उमेदवाराच्या पाठीशी पक्षाचे पदाधिकारी ठामपणे उभे राहिले आहेत. त्यात विशेषत: जिल्हाप्रमुख व महानगरप्रमुखांनी आपापल्या पातळ्यांवर प्रचाराची धुरा सांभाळल्याने उमेदवार बहुतांश मतदारांपर्यंत पोहोचला आहे. परंतु, त्यामुळे सगळेच काही आलबेल आहे असेही मानता येत नाही. अजूनही काही मोजके पदाधिकारी विरोधी उमेदवाराच्या संपर्कात आहेत. तर, काहींनी प्रचारकाळात मौनी बाबाची भूमिका घेण्याचे निश्चित केले आहे. या पदाधिकार्‍यांना मनविण्याचे प्रयत्न पक्षीय पातळीवर झाले आहेत; परंतु त्यात फारसे यश लाभले नाही. कदाचित विरोधी उमेदवाराशी प्रतारणा न करण्याच्या भूमिकेतून संबंधित पदाधिकार्‍यांनी अशी ‘नरो वा कुंजरो वा’ भूमिका घेतली असेल. आपले कोण आणि परके कोण, हे ओळखण्यात गफलत होण्याची शक्यता असल्याने तूर्तास सर्वांनाच आपले म्हणत प्रचारावर लक्ष केंद्रित करण्याचे उमेदवाराने ठरविलेले दिसते.


फाजिल आत्मविश्वास
यंदाचा विजय निश्चित आहे, असा फाजिल आत्मविश्वास बाळगत सेनेचे काही पदाधिकारी प्रचार करीत आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या वेळी गाफील राहण्याच्या भीतीने जुन्या शिवसैनिकांना ग्रासले आहे. ‘रात्र वैर्‍याची आहे’ असे म्हणत सेनेने पुढील डोळ्यात तेल घालून होणार्‍या घडामोडींवर लक्ष ठेवल्यास संभावित अनर्थ टाळला जाऊ शकतो.


विरोधी पक्षातील घडामोडी शिवसेनेच्या पथ्यावर
शिवसेनेची लढाई आहे ती आघाडीचे उमेदवार छगन भुजबळ यांच्याशी. स्वपक्षीयांसह मित्रपक्षाचे असहकार्य, सिन्नर, इगतपुरी तालुक्यात विरोधात वाहणारे राजकीय वारे तसेच जातीयवादाचे वाढते गारुड यामुळे भुजबळ यांना ही निवडणूक फारशी सोपी राहिलेली नाही. या घडामोडी गोडसे यांच्या पथ्यावर पडू शकतात. परंतु, भुजबळ हेदेखील ‘कच्चे खिलाडी’ नसल्याने ते या घडामोडींचा नूर रातोरात पलटवू शकतात, असा विश्वास त्यांच्या निकटवर्तीयांना आहे. अशा परिस्थितीत आतापासूनच विरोधकांच्या गोटातील घडामोडी ‘कॅश’ करण्याचे आव्हान गोडसेंवर आहे. दुसरीकडे मनसेचे उमेदवार डॉ. प्रदीप पवार यांनीही जोर धरला आहे. त्यामुळे मतांची ताटातूट होण्याची धास्तीही शिवसैनिकांना आहेच.


असर्मथनीय हालचालींकडे दुर्लक्ष
मित्रपक्ष भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला झुकते माप आणि रिपाइंचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सभा, समारंभ तसेच प्रचाराला असलेली अनुपस्थिती या बाबी शिवसेनेची डोकेदुखी ठरत आहेत. परंतु, त्याविषयी फारशी वाच्यता न करता शिवसेनेचे पदाधिकारी प्रचारकार्यात सध्यातरी मग्न आहेत. संबंधित बाबींवर शिवसेना स्टाईल तिखट प्रतिक्रिया दिल्यास तोंडाशी आलेला घासही हिरावला जाईल, या भीतीनेच कदाचित भाजप आणि रिपाइंच्या असर्मथनीय हालचालींकडे शिवसेना सध्यातरी काणाडोळा करीत आहे.