आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena Opposed To Pandavleni Herbal Medicines Park

पांडवलेणी येथील वनौषधी उद्यानाला शिवसेनेचा विराेध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- मनसेच्या ‘ड्रीम प्रोजेक्ट’पैकी एक असलेल्या पांडवलेणी येथील वनौषधी उद्यानावरून आता शिवसेना आक्रमक झाली असून, शहरातील उद्यानांच्या देखभाल- दुरुस्तीची कामे प्रथम सुरू करा त्यानंतर पक्षाची ध्येय-धोरणे राबवा, अशी मागणी मंगळवारी (दि. ९) होणाऱ्या महासभेत केली जाणार आहे. दरम्यान, ११ जून रोजी राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर येत असून, या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा विरोध मनसेसाठी चिंतेची बाब ठरणार आहे.
मंगळवारी होणाऱ्या महासभेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी शिवसेनेच्या बैठकीत वनौषधी उद्यानाच्या प्रस्तावाला विरोध करण्याचा सूर आळवण्यात आला. शहरात जवळपास साडेचारशे उद्याने असून, सद्य:स्थितीत त्यांच्या देखभाल-दुरुस्तीचे काम थांबलेले आहे. मागील महासभेत हे काम बचतगट प्रशिक्षित संस्थांना देण्याचा निर्णय झाला होता. मात्र, ठरावाअभावी उद्यान विभागाला कारवाई करता आली नव्हती. या मुद्यावरून शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्ते यांनी महापौरांवर टीका केल्यानंतर तातडीने ठराव पाठवण्यात आला. प्रत्यक्षात त्यानंतरही निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्यामुळे आता शिवसेनेने मनसेला घेरण्याची तयारी सुरू केली आहे.
महासभेत पांडवलेणीच्या पायथ्याखालची जागा महापालिकेला हस्तांतरित करण्याबाबत प्रस्ताव असून, शहरातील उद्याने प्रथम चांगली करा, मग पांडवलेणीच्या उद्यानाचे बघा, अशी भूमिका शिवसेनेकडून घेतली जाणार आहे. उद्यानेच नाही, तर पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हरित शहर करण्यासाठी वृक्षारोपणासारख्या योजना राबविलेल्या नाहीत. साधे ट्री गार्डही खरेदी केले नसल्याचा टोला त्यांनी लगावला.
शाळांच्या मंगल कार्यालयावरून वाद :महापालिकेच्या शाळा क्रमांक १२५ येथे लग्न समारंभ वा इतर कार्यक्रम घेण्यावरून मनसेतील नगरसेवकांमध्ये जुंपल्याचे चित्र आहे. संगीता गायकवाड यांनी येथील कार्यक्रमांना विरोध केला आहे, तर स्थायीचे माजी सभापती रमेश धोंगडे यांनी पाठिंबा दिला आहे. यावर महासभेत निर्णय होणार आहे. दरम्यान, सिडको सहाव्या योजनेच्या हस्तांतराचा विषयही गाजण्याची चिन्हे आहेत.
खासगी नवनिर्माणाला आक्षेप
- गोदा पार्क, वनौषधी उद्यानासारख्या प्रकल्पातून मनसे खासगी नवनिर्माण करीत आहे. मुळात शहराच्या दृष्टीने महत्त्वाच्या उद्यानांकडे बघितले जात नाही दुसरीकडे वनाैषधी उद्यानासाठी धडपड केली जाते, ही बाब दुर्दैवी आहे. प्रकल्पाला विरोध नसून, प्रथम शहरातील उद्याने चांगली करा त्यानंतर वनाैषधी उद्यानाचे बघा, अशी शिवसेनेची मागणी असेल.
अजय बोरस्ते, गटनेता, शिवसेना