आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुजबळांना ‘जय महाराष्ट्र’ करीत चुंभळे शिवसेनावासी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचे कट्टर समर्थक म्हणून अाेळखले जाणारे त्यांच्याच कृपाशीर्वादाने महापालिका जिल्हा परिषदेतील महत्त्वाची पदे मिळवणारे शिवाजी चुंभळे हे मंगळवारी (दि. १८) ‘माताेश्री’वर शिवबंधनात अडकणार अाहेत. भुजबळ यांना ‘जय महाराष्ट्र’ करीत चुंभळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमधील महत्त्वाचे पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार अाहेत.
शिवाजी चुंभळे कल्पना चुंभळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक असून, जिल्ह्याच्या राजकारणात चुंभळे यांचा चांगलाच दबदबाही अाहे. राष्ट्रवादीत असताना भुजबळ यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून त्यांची अाेळख हाेती. मागील पंचवार्षिकमध्ये नगरसेवक म्हणून निवडून अाल्यानंतर महापाैरपदासाठी चुंभळे यांना उमेदवारी दिली हाेती. त्यावेळी राष्ट्रवादीने तटस्थ राहण्याचा एेनवेळी निर्णय घेतल्यामुळे मनसेचा महापाैर हाेऊ शकला.
दरम्यान, भुजबळ यांनी त्याची भरपाई करीत स्थायी समिती सभापतिपदासारखी महत्त्वाची खुर्ची पुढे चुंभळे यांना दिली. तिकडे अपक्ष असूनही चुंभळे यांची सून विजयश्री यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा लाल दिवाही दिला. चुंभळे यांच्यावरील विशेष प्रेमामुळे भुजबळ यांचे अनेक जवळचे समर्थक त्यावेळी दुखावले गेले हाेते. दरम्यान, बेहिशेबी मालमत्ता महाराष्ट्र सदन घाेटाळ्यानंतर भुजबळ हे तुरुंगात अडकले. त्यानंतर राष्ट्रवादीला माेठी घरघर लागली हाेती. दुसरीकडे महापालिका निवडणुकीची समीकरणेही बदलून शिवसेना भाजपचे वारे वाहू लागले. भुजबळ नसल्यामुळे राष्ट्रवादीची अडचणीत असलेली नाैका दुसरीकडे प्रभागात शिवसेना भाजपचे वारे लक्षात घेत चुंभळे यांनीही राष्ट्रवादीला ‘जय महाराष्ट्र’ करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त अाहे. बुधवारी चुंभळे हे ‘माताेश्री’वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधणार अाहेत. केवळ अापणच नाही तर राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारीही शिवसेनेत प्रवेश करीत असल्याचे चुंभळे यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना सांगितले.
नाशिकरोड येथील मनसेचे नगरसेवक अशोक सातभाई गिरीश मुदलियार हे मंगळवारी ‘मातोश्री’वर जाऊन शिवबंधन हाती बांधून सेनेमध्ये प्रवेश घेणार आहेत. त्यामुळे शिवसेनेची १८ आणि २० या प्रभागामध्ये ताकद वाढणार आहे. शिवसेनेने त्यांना उमेदवारी बहाल केली तर पूर्वीपासूनच सेनेकडून निवडणूक लढविण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांचा नक्कीच हिरमोड होणार आहे.
नाशिक महापालिकेची निवडणूक तोंडावर आल्याने भाजप आणि शिवसेनेमध्ये आयारामांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर, नाशिकरोडला गत पंचवार्षिक निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांच्या क्रेझमुळे मनसेचे सहा नगरसेवक निवडून आले होते. राज यांचा करिष्मा कमी झाल्याने सुरुवातीला हेमंत गोडसे, शोभना शिंदे, संपत शेलार, रमेश धोंगडे, संगीता गायकवाड यांनी पूर्वीच दुसऱ्या पक्षात प्रवेश केला. आता उरलेसुरले नगरसेवक अशोक सातभाई मंगळवारी ‘मातोश्री’वर जाऊन शिवबंधनात अडकणार असल्याने ही संख्या आता शून्यावर आली आहे. त्यामुळे नाशिकरोडला मनसेमध्ये बोटावर मोजण्याइतके कार्यकर्ते शिल्लक राहिले असून, तेही कधी ‘जय महाराष्ट्र’ करतील हे सांगता येत नाही.

जेलरोडच्या प्रभाग १८ मधून शिवसेनेचे शिवा ताकाटे, विक्रम खरोटे आदींसह निष्ठावंत शिवसैनिक म्हणून जनतेचे काम करीत आहेत. परंतु, नव्याने शिवसेनेत येणाऱ्या इच्छुकांमुळे त्यांच्यावर अन्याय होतो की काय, ही भीती कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सहा नगरसेवक देणाऱ्या नाशिकरोड विभागात एकही नगरसेवक राहिला नसल्याने यामध्ये पदाधिकाऱ्यांचे सपशेल अपयश दिसून येत आहे.
बातम्या आणखी आहेत...