आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘अंडरग्राउंड’ सेनापतींचे सांस्कृतिक (मो)हल्ले.!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवरायांचे व्यक्तिचित्र बहुजन हिताच्या नजरेतून उभे करून त्यांच्यातील आद्य समाजसुधारकाची, धर्मनिरपेक्षतेची आजवर फार बाहेर येऊ न शकलेली लखलखित बाजू ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकातून मांडणार्‍या निर्माता, दिग्दर्शक व कलावंतांना राज्यात गेल्या दोन वर्षांपासून प्रचंड दाद दिली आहे. त्यातील कलावंत जालना जिल्ह्यातील गरीब शेतकर्‍यांची मुले आहेत. नाट्यगृहात जाऊन सेन्सॉरसंमत झालेल्या आणि छत्रपतींच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा फार महत्त्वाचा पदर जगापुढे आणणार्‍या या नाटकाला विरोध करणार्‍यांना आधी मराठी संस्कृती समजून घ्यावी लागेल.

ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक, वैचारिक या सर्व अंगांचा अभ्यास करून ‘छत्रपती’ समजून घ्यावे लागतील आणि ज्यांनी छत्रपती उमगून घेतले त्यांचाही अभ्यास करावा लागेल. ज्यांनी समजून घेत समजावूनही दिले, त्यांचा अभ्यास करावा लागेल. ज्यांनी समजून न घेताही समजावून देण्याचा अट्टहास केला, त्यांचाही अभ्यास करावा लागेल. ज्यांनी समजावून घेतले, पण समजावून देताना समजावून घेणार्‍यांच्या भाबडेपणाचा, अडाणीपणाचा गैरफायदा घेत स्वहित पाहत संदर्भच बदलून टाकले, त्यांचाही अभ्यास करावा लागेल. एवढे सारे करण्यासाठी निदर्शक ‘अभ्यासूंना’ आयुष्याचा किती काळ द्यावा लागेल, याचा हिशेबही त्यांनी करून ठेवायला हवा. एवढे प्रयोग झाल्यावर महानगरांपासून खेड्यापाड्यापर्यंतच्या सार्‍या महाराष्ट्राने मनापासून स्वीकारलेल्या आणि साहित्य सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गजांनी ‘घाशीराम’नंतरचा मैलाचा दगड म्हणून कौतुक केलेल्या या नाटकाला असा असंस्कृत विरोध होणे विशिष्ट समूहाचे प्रतिगामित्व अधोरेखित करते.

ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांच्या विचारांना आधुनिक काळाच्या निकषावर घासून तपासत राहणे, मूल्यमापन करीत राहणे आणि त्या विचारांचा अस्सलपणा, र्शेष्ठत्व अबाधित ठेवत त्यांच्या कार्याला कृतज्ञ नमस्कार करीत राहणे, हेच खरे सुज्ञ, पुढारलेल्या समाजाचे लक्षण असते. पण, समाजाचे हे असे सुज्ञ होत जाणे आणि सुरक्षित होत जाणे हे अशा तथाकथित संस्कृतीरक्षकांना, त्यांच्या सत्तेला असुरक्षित वाटते. म्हणूनच समाज सुजाण, सुज्ञ होण्याच्या दृष्टीने जेव्हा जेव्हा सांस्कृतिक पातळीवरून असे प्रयत्न होऊ लागतात, तेव्हा तेव्हा ‘वर्चस्व’ गमावण्याच्या भीतीतून अशा प्रकारची सांस्कृतिक हिंसा घडविली जाऊ लागते! मराठी रंगभूमी केवळ सांस्कृतिकच नव्हे, तर सामाजिक चळवळीचेही फार मोठे व्यासपीठ आहे. अशा घटनांनी हे व्यासपीठ कधीच खचले नाही. कालच्या ‘घाशीराम’पासून ते आजच्या सत्यशोधक, शिवाजी अंडरग्राउंड..पर्यंतच्या बर्‍याच नाटकांनी थोर, ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांच्या विचारांना नव्या आयामातून मांडले आहे. इतिहास हा ‘पौराणिक कथांच्या भक्तीयुक्त आवरणातून’ ऐकण्याची पारंपरिक सांस्कृतिक बळजबरी मोडीत काढू पाहणार्‍या अशा कलाकृती, साहित्यकृती येत राहणे ही काळाची गरज आहे. हे समजण्याइतके तरी आपण प्रगल्भ होऊया..

(लेखक नाट्यदिग्दर्शक-लेखक आहे. )