आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेटच्या मैदानात उतरल्यावर बॅट-बॉलचाच विचार करा- शिवनारायण चंदरपॉल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- क्रिकेटच्या मैदानात उतरल्यावर केवळ बॅट आणि बॉल या दोनच गोष्टींचा विचार करायचा, अन्य बाबींना अजिबात महत्त्व द्यायचे नाही. स्वत:वर आणि आपल्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवा, मग यश तुमचेच असेल, अशा शब्दांत विंडीजचा प्रख्यात फलंदाज शिवनारायण चंदरपॉल याने नाशकातील क्रिकेटपटूंना महत्त्वाच्या टिप्स रविवारी दिल्या.

त्र्यंबकेश्वर येथून दर्शन करून परतलेला विंडीजचा मधल्या फळीचा फलंदाज शिवनारायण चंदरपॉल याने नाशिकचा धावता दौरा केला. गोल्फ क्लब मैदानावर क्रिकेटचा सराव करणार्‍या बालगोपाळांशी या वेळी संवाद साधत त्याने क्रिकेटच्या विशेष टिप्स दिल्या. ‘क्रिकेट खेळता ना, मग तुमच्यात फलंदाज किती आणि गोलंदाज किती आहेत?’ असे म्हणत त्याने संवाद साधण्यास प्रारंभ केला. क्रिकेटच्या प्रत्येक अंगाचा तुम्हाला आनंद घेता आला पाहिजे. जेव्हा क्रिकेट खेळाल, तेव्हा प्रामाणिकपणे खेळा. मैदानावर उतरल्यावर तुमच्याकडून जे काही सर्वोत्तम करणे शक्य असेल, ते करण्याचा प्रयत्न करा. खेळाच्या सोप्या आणि साध्या नियमांचा रोज अवलंब करा. प्रत्येक क्षणी बॉलवर नजर ठेवा, मग तुम्हाला फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करताना मोठय़ा समस्या येणार नाहीत, अशा शब्दांत चंदरपॉल याने बालक्रिकेटपटूंना मार्गदर्शन केले. गोल्फ क्लब मैदानावर आल्यानंतर नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव समीर रकटे यांनी त्याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या वेळी रतन कुयटे, शेखर गवळी, मंगेश शिरसाट आदी पदाधिकारी उपस्थित होते.

अगदी भक्तिभावाने घेतले दर्शन
मुंबईतील सचिनची दोनशेवी आणि चंदरपॉलची दीडशेवी कसोटी अवघ्या तीनच दिवसांत संपल्याने खास त्र्यंबकराजाचे दर्शन घेण्यासाठी चंदरपॉल शनिवारी आधी त्र्यंबक आणि नंतर नाशिकला येऊन गेला. त्र्यंबकेश्वरलादेखील अत्यंत साधेपणाने आला आणि भक्तिभावाने दर्शन घेऊन त्वरित नाशिकला आणि मग उर्वरित दौर्‍यासाठी मुंबईकडे रवाना झाला.