आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shivsean MLA Anil Kadam Surender To Police, Get Bail

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवसेना आमदार अनिल कदमांची पोलिसांकडे शरणगती, जामीनही मंजूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - टोल नाक्यावर महिलांना उद्देशून केलेली वक्तव्ये आणि शिवीगाळप्रकरणी विनयभंगाच्या दाखल गुन्ह्यात पोलिसांकडून अटक होण्याची शक्यता लक्षात घेत शिवसेनेचे आमदार अनिल कदम यांनी स्वत:हून न्यायालयात शरणागती पत्करली. न्यायालयाने कदम यांना न्यायालयीन कोठडी सुनावत त्यांना जामीन मंजूर केला.

पिंपळगाव टोल नाक्यावरून आमदार कदम हे गुरुवारी (दि. 22) सकाळी मित्राच्या कारमधून जात असताना त्यांच्याकडे टोलनाक्यावरील महिला कर्मचार्‍याने ओळखपत्र मागितले होते. यावरून कदम यांना राग येऊन त्यांनी थेट टोलनाक्यावरील नियंत्रण कक्षात शिरून तोडफोड करीत महिलांना विवस्त्र करण्याची धमकी दिली होती. त्याचबरोबर अश्लील भाषेत शिवीगाळ करीत टोलनाका पेटवून देण्याचा दम भरला होता. या प्रकरणी चार दिवसांपासून शहर व जिल्ह्यात कदम यांच्या निषेधार्थ आंदोलने, मोर्चे काढण्यात आले. कदम यांनीही पक्षर्शेष्ठींकडे आमदारकीचा राजीनामा सादर केला.

दरम्यान, या घडामोडी घडत असतानाच कदम यांच्याविरुद्ध विनयभंग, दमदाटी, तोडफोड, धमकी देण्याचे गुन्हे दाखल करण्यात आले. या गुन्ह्यांमध्ये कदम यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तविली जात होती. निफाड येथे सोमवारी सकाळी 11 वाजता कदम यांच्या विरोधातील कारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेकडून निषेध मोर्चा निघणार होता. या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच तपासी अधिकारी, वरिष्ठ निरीक्षक देवीदास शेळके व त्यांचे पथक कदमांना शोधत होते. मात्र, पोलिसांना गुंगारा देत त्यांनी पिंपळगाव न्यायालयात जाऊन शरणागती पत्करली.

कदम यांनी महिलांना अश्लील भाषेत शिवीगाळ करीत दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला असल्याने पोलिस कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी केली, तर अँड. भाटे, पाटोदकर यांनी आक्षेप घेत जामीनपात्र गुन्हा असल्याने कोठडीची आवश्यकता नाही, असा युिक्तवाद केला. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेत न्यायालयीन कोठडी सुनावली. तोच कदम यांच्याकडून जामीन अर्ज सादर करण्यात आला. यावर न्यायालयाने 15 हजारांच्या व्यक्तिगत जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केला.


कदमांच्या वाहनाने शिस्तीत भरला टोल : पिंपळगावच्या ज्या टोल नाक्यावर चार दिवसांपूर्वी शुल्क भरण्यावरून वाद झाला, त्याच टोल नाक्यावरून सोमवारी न्यायालयात शरणागती पत्करण्यासाठी जाताना आमदार कदमांनी मात्र शिस्तीत 40 रुपये शुल्क भरले. या वेळी ते त्यांच्या मित्राच्या फिगोही कारमध्ये होते


राजकीय हेतूने अडकवल्याचा आरोप
आमदार अनिल कदम यांच्यावर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, त्याबरोबरच लोकप्रतिनिधींनाही अपमानास्पद वागणूक देणारा पिंपळगाव बसवंतचा टोलनाका कायमस्वरूपी बंद करण्यात यावा, या मागणीसाठी सोमवारी शिवसेना, भाजप व मनसे कार्यकर्त्यांसह सर्मथकांनी निफाड येथे तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. मार्केट यार्डापासून निघालेल्या या मोर्चाचा समारोप तहसील कार्यालयाजवळील शिवाजी चौकात झाला. आमदार धनराज महाले, शिवसेना नेते बंडूकाका बच्छाव यांच्यासह उपस्थित नेत्यांनी भाषणामध्ये मतांच्या राजकारणासाठीच आमदार कदमांना या प्रकरणात अडकवण्यात आल्याचा आरोप केला.