आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena Agitation Against Bad Condition Of Roads

खड्डे बुजवण्यासाठी नाशिकमध्ये शिवसेनेचे ‘ओली’म्पिक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- नाशकातील खराब रस्ते व खड्डे दुरुस्त न करणार्‍या मनापातील सत्ताधारी मनसेला धडा शिकवण्यासाठी शिवसेनेने महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांच्या प्रभागातच खड्ड्यांवर लांब उडी स्पर्धा घेऊन चांगलीच सलामी दिली. हे उपरोधिक आंदोलन मनावर घेऊन खड्डे बुजवले नाही तर जनआंदोलन करण्याचा इशारा शिवसेना गटनेते अजय बोरस्ते यांनी दिला.

खड्ड्यांमुळे नाशिककर बेहाल झाले असताना, दुसरीकडे तात्पुरती मलमपट्टी करणार्‍या मनसेला घेरण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबरच शिवसेनाही आक्रमक झाली आहे. विरोधी पक्षनेतेपद असूनही शिवसेना का शांत आहे, असा मुद्दा संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी थेट रस्त्यावर उतरून शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांना आंदोलनाचा इशारा दिला. त्यानुसार, खड्ड्यांमध्ये लांब उडी स्पर्धेचे आयोजन गटनेते अजय बोरस्ते यांनी केले होते. त्याची सुरुवात शहरातील रविवार कारंजावरून रेडक्रॉसकडे येणार्‍या रस्त्यावर शिवसेना मध्य नाशिकच्या पदाधिकार्‍यांनी केली.

शुक्रवारी दुपारी लांब उडी स्पर्धा सुरू झाली. पंधरा ते सोळा खड्डे हेरून त्यावर स्पर्धा पार पडली. शिवसेनेच्या 35 ते 40 कार्यकर्त्यांनी स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर हळूहळू नागरिकही यात सामील होण्यासाठी येऊ लागले. त्यात विद्यार्थ्यांचा सहभाग मोठा होता. आंदोलनाचे नेतृत्व नीलेश कुलकर्णी, आशिष साबळे, संतोष कहार, महेश बिडवे यांनी केले.


शिवसेनेच्या काळात खड्डेच पडले नाहीत का?

शिवसेनेच्या काळात रस्त्यांवर कधी खड्डे पडले नाहीत का? त्यांच्या काळात तयार झालेल्या रस्त्यांवरच आज सर्वाधिक खड्डे आहेत. मुंबईत सेनेची सत्ता असून सर्वाधिक खड्डे याच शहरात आहेत. केवळ प्रसिद्धीसाठी मनसेच्या कामकाजावर टीका केली जाते. रस्त्यांवरील 20 टक्के खड्डे बुजवले गेले. पावसामुळे अन्य खड्डे बुजवता आलेले नाही. यापुढे खड्डे बुजवण्यासाठी विशिष्ट डांबराचा वापर करण्यात येणार आहे. - रमेश धोंगडे, सभापती


..तर जनआंदोलन

खड्ड्यांमध्ये लांब उडी स्पर्धा हा केवळ मनसेला इशारा आहे. या उपरोधिक आंदोलनाची दखल घेऊन ठोस उपाययोजना न केल्यास शिवसेना जनआंदोलन छेडेल. त्याच्या परिणामास मनसेच जबाबदार असेल. - अजय बोरस्ते, गटनेता, शिवसेना