आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चैतन्यमय मेळाव्याने शिवसैनिकांच्या मनातील मळभ झाले दूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेना खर्‍या अर्थाने पोरकी झाली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांचे प्रकृतिअस्वास्थ्य आणि काही मुद्यांवर त्यांनी घेतलेली मवाळ भूमिका यामुळे ‘एक होती शिवसेना’ असे म्हणण्याची वेळ येते की काय, अशी भयशंका सच्च्या शिवसैनिकाला डाचू लागली होती. मात्र, नाशिकमध्ये झालेल्या बूथप्रमुख आणि पदाधिकारी मेळाव्याने आजवर झालेल्या चर्चेचे मळभ काही प्रमाणात दूर झाले आहे. भगव्याला आलेले चैतन्य, मेळाव्याची उपस्थिती आणि सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे उद्धव ठाकरे यांचे परिपक्व आणि ओघवत्या शैलीतील भाषण हे शिवसेनेच्या सुवर्ण भविष्याचे संकेतच देऊन गेले.

नाशिक हा शिवसेनेचा एकेकाळचा बालेकिल्ला. त्यामुळे मुंबईनंतर बाळासाहेब ठाकरे यांचे प्रेम होते ते नाशिकवरच. बाळासाहेबांच्या निधनानंतर मात्र शिवसेनेत मोठीच पोकळी निर्माण झाली. बाळासाहेबांनी ज्या वेगाने आणि ज्या थाटात शिवसेना वाढवली त्याच थाटात यापुढे सेना वाढेल का, किंबहुना शिवसेनेचे आता अस्तित्व टिकेल का, अशी शंकाच विविध चर्चांमध्ये व्यक्त होत होती. त्यातच उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतिअस्वास्थामुळे सेनेत काही काळ स्मशानशांतता होती. अन्य प्रतिस्पर्धी पक्ष मात्र वार्‍याच्या वेगाने पुढे जात असल्यामुळे जुन्या शिवसैनिकांत अस्वस्थता वाढली होती. या पार्श्वभूमीवर या मेळाव्यानिमित्त उद्धव ठाकरे हे शनिवारी नाशकात दाखल झाले. रविवारी दुपारी दादासाहेब गायकवाड सभागृहात त्यांची सभा झाली. सभेला उपस्थित शिवसैनिक, त्यांच्या घोषणा, जयजयकार आणि उद्धव ठाकरे यांचे सर्वव्यापी भाषण यामुळे नाशिकमध्ये सेनेला गतवैभव प्राप्त होईल, अशी आस जुन्या शिवसैनिकाला लागली नसेल तर नवल. ठाकरे यांनी केवळ पालकमंत्री भुजबळ हेच ‘टार्गेट’ न ठेवता शरद पवार, मुख्यमंत्री चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर. आर. पाटील यांचाही समाचार घेतला. हिंदुत्वाचा मुद्दा पटवून देतानाच त्यांनी दहशतवादाला खतपाणी घालणार्‍या सरकारलाही तोफेसमोर उभे केले. याशिवाय ज्यासाठी सभेचे आयोजन केले होते, त्या बूथप्रमुखांची यापुढील जबाबदारी काय, याविषयीदेखील मार्गदर्शन केले. हे करताना आपली मूळची शैली जपत आक्रमकतेचा आविर्भाव त्यांनी आवर्जून टाळला. अर्थात, सभेतील गर्दी ही केवळ ठाकरेंच्या प्रेमापोटी होती असे म्हणणेदेखील धाडसाचेच ठरेल. आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने इच्छुकांनी शक्तिप्रदर्शनासाठी आपापल्या कार्यकर्त्यांना सभास्थळी आणले होते. याशिवाय दीर्घ प्रतीक्षेनंतर नियुक्त सात उपमहानगरप्रमुखांनीही आपापल्या कार्यकर्त्यांना सभागृहाकडे वळविले होते. नेत्यांची एकी व कार्यकर्त्यांची गर्दी भविष्यातही टिकवून ठेवण्यात या मंडळींना यश आल्यास आगामी निवडणुकांमध्ये सेनेचा बोलबाला असेल यात शंकाच नाही.