आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघर्ष: नाशिक येथील इतिहास संग्रहालयाचा शिवसैनिकांकडून ताबा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नाशिक- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या जागेसाठी शिवसेनेने सोमवारी गंगापूररोडवरील इतिहास संग्रहालयावर चाल करत ताबा मिळवून कमान उभारली. दरम्यान, स्मारकाच्या मुद्दय़ावरून शिवसेनेकडून नाहक राजकारण केले जात असल्याचा आरोप मनसेने केला आहे.

गेल्या मार्च महिन्यातील महासभेत शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचा प्रस्ताव आला होता. त्याला सर्वपक्षीय सदस्यांनी सहमती दर्शविली होती. स्मारकाचे स्वरूप व जागेच्या निर्णयासाठी सर्वपक्षीय गटनेत्यांची समिती स्थापनेची महापौरांनी घोषणा केली होती. त्यानंतर झालेल्या बैठकीत इतिहास संग्रहालयाच्या जागेबाबत जवळपास एकमतही झाले होते. मात्र, स्मारकाच्या घोषणेला सात महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही सत्ताधार्‍यांकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने शेकडो शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेत इतिहास संग्रहालय गाठले. त्यानंतर ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक’, अशी कमान उभारत घोषणा दिल्या. आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर, गटनेता अजय बोरस्ते आदी सहभागी झाले होते.

विरोध नाही
इतिहास संग्रहालयाला शिवसेनेचा अजिबात विरोध नाही. त्याठिकाणी शिवसेनाप्रमुखांचे स्मारक झाल्यास अधिक योग्य राहील. सभागृहात झालेल्या निर्णयाचा आदर ठेवून तात्काळ कार्यवाही करावी. आम्ही एकजुटीने लढा देऊ. '- -सुधाकर बडगुजर, विरोधी पक्षनेता

असे असेल स्मारक
इतिहास संग्रहालयाचा परिसर 7.50 एकराचा आहे. त्यात दीड एकर जागा शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी मिळावी, अशी शिवसेनेची मागणी आहे. या स्मारकात शिवसेनाप्रमुखांचा भव्य पुतळा व त्यांचा जीवनपट, त्याचबरोबर ऑडीटोरियम, आर्ट गॅलरी, ग्रंथालय असू शकेल. यावर्षीच्या अंदाजपत्रकात स्मारकासाठी तीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

महासभाच बंद पाडू
सत्ताधारी मनसेने पुढील महासभेपर्यंत स्मारकाविषयीचा आराखडा व आर्किटेक्टचे नाव जाहीर न केल्यास महासभाच बंद पाडू, असा खणखणीत इशारा गटनेते अजय बोरस्ते यांनी दिला आहे. ओठात एक आणि पोटात एक अशी मनसेची भूमिका आहे. निधीची तरतूद आणि जागा असूनही कार्यवाही न करण्याचा अर्थ काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.