आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आघाडीच्या काळात अत्याचार वाढले, सत्ताधार्‍यांना गाडा खड्डय़ांत - खासदार राऊत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - राज्यातील सत्ताधार्‍यांच्या नाकर्तेपणामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली असून मुंबईत दिवसाढवळ्या होणार्‍या अत्याचाराच्या घटनांमुळे महिला असुरक्षित झाल्या आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत पुन्हा शिवशाहीची सत्ता येणार असल्याचा विश्वास व्यक्त करत खासदार संजय राऊत यांनी राज्यातील नाकर्त्या सत्ताधार्‍यांना नाशकातील खड्डय़ांत गाडून टाकण्याचे थेट आवाहन केले.

सिडकोतील विविध विकासकामांच्या उद्घाटन व भूमिपूजन कार्यक्रमासाठी खासदार राऊत शनिवारी नाशकात आले होते. त्यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, शिवसेनाप्रमुखांच्या शिवसेनेने स्वार्थासाठी कधीही राजकारण केले नाही. मराठी तरुणांच्या हक्कांसाठी लढणारी संघटना म्हणून शिवसेनेने राजकारणापलीकडे जाऊन कामे केली. गेल्या 40 वर्षांत अनेक संघटना आल्या अन् गेल्या. परंतु, शिवसेना आजही अस्तित्वात आहे. शिवसेनेचे हे जहाज कधीच बुडणार नाही. शिवसैनिकांसाठी पंढरपुरचा विठोबा आणि शिवसेनाप्रमुख हे दोनच दैवत आहेत. शिवसेनाप्रमुखांनी तमाम शिवसैनिकांना सदैव चेतना आणि दिली, उभारी दिली. पाकिस्तानचा हल्ला झाला की, शिवसेनेची आठवण येते. आजच्या अस्थिर वातावरणात शिवसेनेच्या काळात असलेल्या सुरक्षिततेची प्रकर्षाने आठवण होते, असेही खासदार राऊत यांनी सांगितले.

या वेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख रवींद्र मिर्लेकर, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, नंदुरबारचे जिल्हाप्रमुख दीपक गवते, महापालिका विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर, नगरसेवक हेमंत गोडसे, विनायक पांडे, शिवाजी सहाणे, अजय बोरस्ते, कोमल मेहरोलिया, हर्षा बडगुजर, सचिन मराठे, मामा ठाकरे, माणिक सोनवणे यांसह नगरसेवक व पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

आघाडीच्या काळात वाढले अत्याचार
शिवशाहीच्या सत्ताकाळात राज्यातील महिला सुरक्षित होत्या. परंतु, गेल्या दहा वर्षांत केंद्र व राज्य सरकारच्या काळात अत्याचार वाढले. तरुणी व महिलांना घराबाहेर वावरताना असुरक्षित वाटू लागले आहे. राज्याच्या राजधानीत तर महिलांवर दिवसाढवळ्या अत्याचार होत आहेत. सत्ताधार्‍यांच्या नाकर्तेपणामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून, महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. असेही खासदार राऊत म्हणाले.

जिल्हाप्रमुखांत हवी त्यागाची भावना
वारकरी संप्रदायाची व्यक्ती नाशिकला जिल्हाप्रमुखपदी काम करत असल्याचा संदर्भ देत खासदार राऊत यांनी राज्यातील सर्व जिल्हाप्रमुखांनीही नाशिकच्या जिल्हाप्रमुखांची त्यागाची भावना आत्मसात करावी, असा सल्ला दिला.

या विकासकामांचे झाले उद्घाटन
खासदार राऊत यांच्या हस्ते दत्तनगरातील बाळासाहेब ठाकरे उद्यान, सावतानगरमधील हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अभ्यासिकेचे लोकार्पण झाले. तसेच अद्ययावत व्यायामशाळेचे भूमिपूजन करण्यात आले.