आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशकात महिला टोलनाक्यावर शिवसेना आमदाराची तोडफोड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- केवळ महिला कर्मचारीच चालवत असलेल्या देशातील एकमेव पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावर शिवसेनेचे आमदार अनिल कदम यांनी गुरुवारी तोडफोड केली. गाडी अडवून टोल मागितल्याचा राग आल्याने कदम यांनी हा धुडगूस घातला. इतकेच नव्हे तर नाक्यावरील महिला कर्मचा-यांना शिवीगाळही केली. या प्रकरणी कदम यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास निफाडचे आमदार कदम, त्यांचे मित्र समीर जोशी (रा.पिंपळगाव) हे कारने मुंबई- आग्रा महामार्गावरून जात होते. पिंपळगावच्या टोलनाक्यावर कदम यांच्या चालकाने कार अत्यावश्यक लेनमधून घेतल्याने टोलनाक्यावरील महिला कर्मचा-याने त्यांच्याकडे शुल्क मागितले. त्यावर चालकाने गाडीत आमदार बसले असल्याचे सांगितले, तरीही पुन्हा सदर महिलेने त्यांच्याकडे ओळखपत्राची विचारणा केली. या प्रकारामुळे कदम संतापले व त्यांनी कारमधून उतरून थेट टोलच्या नियंत्रण कक्षात घुसून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. याठिकाणी उपस्थित प्रोजेक्ट मॅनेजर वसुंधरा राव व सहकारी महिला या प्रकारामुळे घाबरल्या. त्यांनी कदम यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र ऐकण्याच्या मन:स्थितीत नसलेल्या आमदारांनी केबिनमधील खुर्ची फेकून देत कॉम्प्युटरची तोडफोड केली. तसेच ‘याद राखा, परत जर माझ्या वाट्याला गेल्यास पेटवून देईल’ असा दम दिल्याचे या महिलांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, तोडफोडीची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास शेळके यांनी घटनास्थळी धाव घेत आमदारांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. या वेळी चांदवडचे आमदार शिरीष कोतवाल यांनीही थांबून टोलवरील कर्मचा-यांना लोकप्रतिनिधी माहीत नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली.

पेटवून देण्याची धमकी
पोलिसांनी प्रोजेक्ट मॅनेजर वसुंधरा राव यांना तक्रार देण्यास सांगितले. कंपनीच्या अधिका-यांशी बोलून त्यांनी तक्रार दिली. आमदार कदम व त्यांच्या सहका-यांनी नियंत्रण कक्षात घुसून दमदाटी व शिवीगाळ केल्याचा आणि टोल पेटवून दिल्याची धमकी दिल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले. त्यानुसार पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला.