आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकसभेसाठी शिवसेना घेतेय मनसेचा ठाव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीतील महत्त्वाच्या जागांवरील उमेदवार निश्चित करून एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न केला असला तरी, नाशिक मतदारसंघातील मनसेची घोडदौड बघता सेनेच्या प्रक्रियेला ब्रेक लागला आहे. या मतदारसंघात पालकमंत्री छगन भुजबळ हेच उमेदवार म्हणून जवळपास जाहीर झाले आहेत. त्यांच्याशी लढत देण्यासाठी मनसेचा उमेदवार कोण, हे बघूनच शिवसेना पत्ते उघडणार असल्याचे चित्र तूर्त आहे.

जिल्ह्यात ग्रामीण भागातील सत्ता राष्ट्रवादीकडे आहे. सध्या केंद्र सरकारचे घोटाळे चर्चेत असतानाच निवडणूकपूर्व जनमत चाचणीचा कौलही प्रादेशिक पक्षांच्या बाजूने आहे. राज्यात सेना-मनसेची भूमिका निर्णायक ठरणार असल्याने देन्ही पक्षांत उत्साह आहे. आजारपण विसरून उद्धव यांनी पक्षाची घडी विस्कटू नये, याकडे लक्ष केंद्रित केले. लोकसभा निवडणुकीसाठी वर्षभर आधीच लोकांसमोर उमेदवार देण्याची तयारी केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ठाकरे यांनी भाजपासोबतची युती गृहित धरून यंदाही 22 मतदारसंघांत उमेदवार निश्चित केल्याचे वृत्त आहे. मात्र, नाशिकबाबत द्विधा निर्माण झाल्याचे पदाधिकार्‍यांनी खासगीत सांगितले.

संभाव्य चेहरे असे. : सेनेकडून विजय करंजकरच लढवणार असल्याचे काही महिन्यांपूर्वी चित्र होते. मात्र उमेदवारीच्या आशेवरून मनसेतून आलेल्या गोडसे यांच्यामुळे स्पर्धा वाढली. याच जागेवरून शिवसेनेतून काँग्रेसवासी झालेले माजी महापौर दशरथ पाटील हेही स्वगृही परतून निवडणूक लढवतील, अशीही चर्चा सुरू आहे. महापालिकेतील गटनेते अजय बोरस्ते यांच्या रूपानेही सक्षम उमेदवाराची चाचपणी होत असली तरी, खुद्द बोरस्ते त्यासाठी अद्याप पुरेसे तयार नसून विधानसभेसाठी लक्ष केंद्रित केल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, मित्रपक्षाच्या खासदारांचेही नाव पुढे येत असल्याचे व कॉँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेवकाच्या नावाला पक्षर्शेष्ठींनी स्पष्ट नकार दिल्याचे वृत्त आहे. शेवटी मनसेच्या रणनीतीनंतरच शिवसेना उमेदवार ठरविणार हे निश्चित!

शिवसेनेला सक्षम उमेदवारांचा शोध
लोकसभेसाठी सक्षम उमेदवाराचा शोध घेतला जात आहे. गेल्या वेळी मनसेच्या तिकिटावर निसटता पराभव झालेल्या हेमंत गोडसे यांना पक्षात आणण्यात यश आले. मात्र, त्यानिमित्त उघड झालेल्या गटबाजीमुळे उमेदवारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडे गोडसे यांच्या आरोपाने मनसे नेत्यांमधील अस्वस्थता दूर करून ‘सर्वमान्य’ उमेदवार द्यावा लागणार आहे. सध्या चर्चा असलेल्या दोघांपैकी ज्याला मिळणार नाही, त्यालाही चाचपून पाहण्याची शक्यता आहे.