आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात शिवसेना आता चालणार आक्रमक ‘मार्गा’वर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - खराब रस्ते व खड्डय़ांची दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी डिफर्ड पेमेंटसारख्या पांढर्‍या हत्तीचा पर्याय वापरत नवीन रस्ते बांधण्याच्या विषयावरून मनसेला घेरण्याचे आदेश शिवसेनेचे संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांनी बुधवारी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना दिले. त्यामुळे आतापर्यंत बॅकफूटवर असलेल्या शिवसेनेला महापालिकेत मनसेविरोधात आक्रमक होणे भाग पडणार आहे.


शिवसेना कार्यालयातील बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेकडे महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपद असताना खराब रस्ते व खड्डय़ांवरून सत्ताधार्‍यांना जाब विचारला जात नसल्याचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावर मिर्लेकर लागलीच पदाधिकार्‍यांकडून माहिती घेत शहरात संघटनात्मक पातळीवर आंदोलन सुरू असल्याचे स्पष्ट केले. नवीन सिडकोत शिवसेनेने खड्डय़ात रोपे लावून केलेल्या अभिनव आंदोलनाची माहितीही त्यांनी दिली. महापालिकेत मात्र महासभेच्या माध्यमातून शिवसेनेकडून हवा त्या पद्धतीने जाब विचारला गेला नसल्याचे कबूल करीत यापुढे या मुद्यावरून मनसेला कोंडीत पकडले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

प्रस्ताव हाणून पाडू
डिफर्ड पेमेंटमधून 300 कोटींची रस्त्यांची कामे आणि व्याजापोटी तेवढय़ाच रकमेच्या उधळपट्टीविरोधात शिवसेना आक्रमक होईल. एलबीटीतून आतापर्यंत जेमतेम 40 ते 45 कोटी रुपये गोळा झाले असल्यामुळे डिफर्ड पेमेंटची परतफेड कशी करणार, हा प्रश्नच आहे. नवीन रस्त्यांचा प्रस्तावच हाणून पाडू. अजय बोरस्ते, गटनेते, महापालिका