आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena Pramukh Balasaheb Thackeray First Death Anniversary

ओठात एक अन् पोटात एक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवसेनेचे भावंडं म्हणून मनसेकडे पाहिले जात असले तरी कार्यकर्तृत्वाने मनसेची नाशिक महापालिकेत कधीच छाप उमटली नाही. नाशिककरांना दिलेला शब्द न पाळल्याने मनसेच्या कामगिरीविषयी चारचौघ चांगला शब्द काढतील, असे दिसत नाही. ‘हाच माझा पांडुरंग’ म्हणून शिवसेनाप्रमुखांच्या पायी लीन होणार्‍या राज यांच्या पक्षाची सत्ता असूनही स्मारकाचा अंतिम निर्णय न होणे, यातच सर्व आले.
नाशिकवर बाळासाहेबांचा विशेष लोभ होता. मुंबई, पुण्यानंतर नाशिक डोळ्यासमोर ठेवूनच बाळासाहेबांनी शिवसेनेची घोडदौड सुरू केली. अल्पावधीतच त्यांच्यासारखीच अत्यंत आक्रमक व कडवट शिवसैनिकांची फौजही पाठीशी उभी राहिली. शिवसैनिकांनाही बाळासाहेबांनी भरभरून दिले. त्याचा परिणाम म्हणून नाशिकमधील सर्वसामान्य शिवसैनिक मंत्री, खासदार, आमदारापासून तर ग्रामपंचायत सदस्य अशी महत्त्वाची पदे भूषवताना दिसला. बाळासाहेबांच्या हयातीतच जेव्हा त्यांचे पुतणे राज ठाकरे यांनी मनसेचा नवा सवतासुभा निर्माण केला तेव्हाही नाशिक शिवसेनेत मोठी पडझड होईल, असे अंदाज वर्तवले गेले. प्रत्यक्षात मात्र, ते फोल ठरले. शिवसेनेत प्रदीर्घकाळापासून असलेले माजी जिल्हाप्रमुख सुनील बागुल, शहरप्रमुख अर्जुन टिळे, महिला आघाडीच्या शोभा मगर असे काही नेते राष्ट्रवादीवासी झाले खरे, मात्र त्यामागचे कारण बाळासाहेबांचे निधन हे नव्हते. पक्षाच्या दुसर्‍या फळीतील नेत्यांची गटबाजी, नाशिकवर मुंबईतून नियंत्रण ठेवू पाहाणार्‍या नेत्यांकडून होणारा दुजाभाव याविरोधातील खदखदीतून त्यांनी पक्षांतर केले.
दुसरीकडे, यातून समांतर शिवसेना चालवण्याचे जे प्रयोग झाले ते मूळ संघटनेला घातक ठरतील, या भीतीतून त्यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाहेरचा रस्ता दाखवला. बाळासाहेबांच्या निधनानंतर लक्षवेधी ठरतील अशा दोन जाहीर कार्यक्रमांसाठी उद्धव ठाकरे नाशिकला आले. त्यात पहिला कार्यक्रम र्शद्धांजलीवजा सांत्वन मेळावा होता, तर दुसर्‍या कार्यक्रमातून एका नव्या दमात उभ्या राहिलेल्या शिवसेनेची झलक दाखवण्याचा प्रयत्न झाला. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांना भाषणातून आक्रमकता दाखवता आली नसली तरी भरभरून मिळालेला प्रतिसाद बरेच काही सांगून गेला. खासकरून बाळासाहेबांना खरी र्शद्धांजली द्यायची असेल तर येथे महापालिकेवरून उतरलेला भगवा पुन्हा फडकवून दाखवा, असे आव्हानही शिवसैनिकांनी स्वीकारले. पक्षातील एकचालकानुवर्ती व्यवस्था संपुष्टात आली असून, तुम्ही सांगितले तर मी पक्षप्रमुख म्हणूनही राहणार नाही, असे सांगून ठाकरे यांनी लोकशाही व्यवस्थेचा पक्षाने स्वीकार केल्याचे दाखवून दिले. त्याचे पुढे चांगले परिणाम दिसू लागले. महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर गलितगात्र झालेल्या शिवसेनेला नवीन उभारी देण्यासाठी संपर्कप्रमुख म्हणून रवींद्र मिर्लेकर यांनी सूत्रे स्वीकारल्यावर भरभरून प्रतिसाद मिळाला. सेनेपासून दूर गेलेला कडवट शिवसैनिक परतू लागला. अर्थात काही अपवादात्मक स्थितीत मुंबईस्थित एका गटाने हस्तक्षेप सुरूच ठेवल्यामुळे गटबाजी उफाळून येण्याचे प्रकारही घडले. मात्र, त्याची तीव्रता फारशी जाणवली नाही. आंदोलने, कार्यक्रम, संघटनात्मक प्रचारातही विखुरलेले पदाधिकारी एकत्र येताना दिसले. लोकसभा व विधानसभा निवडणुकांत शिवसेनेची भूमिका निर्णायक ठरेल, हे बघून अन्य पक्षांतील वजनदार लोकप्रतिनिधीही आकर्षित होताना दिसत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीतील मनसेचे उमेदवार हेमंत गोडसे, माजी आमदार शिवराम झोले हे शिवसेनेत दाखल झाले आहेत. एकूणच बाळासाहेबांच्या निधनानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेतला तर शिवसेना संपली वा संपण्याच्या मार्गावर आहे, असे चित्र तूर्तास तरी दिसत नाही. याउलट शिवसेनेकडून आगामी काही निवडणुकांत चमत्कार घडला तर नवल वाटणार नाही.