आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भगूर नगरपालिकेत शिवसेनेला १६ जागा, निर्विवाद वर्चस्व; विराेधी अाघाडीला एकच जागा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - भगूर नगरपालिकेत एकतर्फी विजय मिळवत शिवसेनेने पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले अाहे. शिवसेनेने नगराध्यक्षासह नगरसेवकपदाच्या १६ जागांवर विजय मिळवित विराेधकांचा धुव्वा उडवला. भाजपला भोपळाही फोडता आला नाही, तर आघाडीला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. अाघाडी भाजपच्या काही उमेदवारांची अनामतही जप्त झाली.

सोमवारी (दि. २८) सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या २० मिनिटांमध्ये निकाल स्पष्ट झाला. निवडणूक निर्णय अधिकारी राहुल पाटील यांनी सर्वात प्रथम नगराध्यक्षपदाचा निकाल जाहीर केला. सेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अनिता करंजकर पहिल्यापासूनच आघाडीवर असल्याने त्यांचा विजय निश्चित होता. त्यांना पाच हजार ४२० मते पडली, तर राष्ट्रवादीच्या प्रेरणा बलकवडे यांना दाेन हजार ३५ मते पडली. भाजपच्या शोभा भागवत यांना एक हजार ३८३ मते पडली.

भगूर नगरपालिकेवर पुन्हा शिवसेनेने सत्ता प्राप्त करीत भगवा फडकवला आहे. या विजयामुळे सोमवारी शहरात गुलाल उधळत भगवे झेंडे घेऊन युवकांनी विजयी मिरवणूक काढली होती. त्यामुळे संपूर्ण शहर भगवेमय झाले होते, तर नगराध्यक्षपदी निवडून आलेल्या अनिता करंजकर यांनी नगराध्यक्षपदाची हॅट््ट्रिक केल्याने महिलावर्ग अधिक खुशीत दिसत होता. निवडणूक निर्णय अधिकारी राहुल पाटील यांनी विजयी उमेदवार घोषित केल्यानंतर शहरात प्रत्येक विजयी उमेदवारांनी आपल्या घरापासून ते शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्या घरापर्यंत ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढली. विजयी उमेदवारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शहरवासीयांचे आभार मानले.
बातम्या आणखी आहेत...