आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivshahir Open Shivaji Biography Through His Style

शिवशाहिरांच्या शैलीत उलगडले शिवचरित्र

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे गुणांची खाण होते. त्यांच्यात असलेली एकाग्रता हा त्यांचा सर्वात मोठा गुण होता. मात्र, शिवरायांचा नुसता जयजयकार करण्यापेक्षा त्यांच्यातला एकतरी गुण अंगी बाणवा, असा मौलिक उपदेश शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी उपस्थित बालकांना रविवारी दिला.


साहित्य प्रसार केंद्र प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित शिवशाहिरांसमवेत बालकांच्या सहलीत ते बोलत होते. शिवाजी महाराजांच्या पणजोबांचे नाव काय होते? शिवाजी महाराजांना जंजिर्‍याचा किल्ला का जिंकता आला नाही? शिवाजी महाराज आग्रा येथील नजरकैदेतून नेमके कसे सटकले? संभाजी महाराज इतका काळ औरंगजेबाच्या तावडीत आणि महाराष्ट्रातच असतानाही त्यांना मराठी सैन्याने का सोडवले नाही? शिवरायांचा सगळ्यात मोठा गुण कोणता? तुम्हाला शिवरायांच्या सैन्यातलं कोण व्हायला आवडलं असतं? अशा एक ना अनेक बालसुलभ प्रश्नांची दिलखुलास उत्तरे देत पुरंदरे यांनी बालकांच्या या सहलीत त्यांना शिवचरित्राचा रोचक इतिहास खास ‘शिवशाहीर शैली’त उलगडून दाखविला. शिवरायांच्या प्रत्येक अगम्य साहसाच्या ऐतिहासिक सत्याचे दाखले साक्षात शिवशाहिरांच्या तोंडून ऐकल्यावर आसमंतात उमटत होता तो केवळ एकच स्वर, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय.’


आदल्या दिवशी निसटले आग्रा येथील कैदेतून
औरंगजेबाने शिवरायांना कैदेत असताना मारण्याचा तीनदा प्रयत्न केला. त्यात दोनदा तो अपयशी ठरला. तर, तिसर्‍या वेळी त्यांना हालहाल करून मारण्यासाठीचा दिवसदेखील ठरला. दिवस होता शनिवार, दि. 18 ऑगस्ट 1666. पण, शिवरायांचे हेरखाते अत्यंत सतर्क होते. बहिर्जी नाईक यांनी त्यांना 17 तारखेलाच सूचित केले की निसटायचा प्रयत्न आजच करा. त्याप्रमाणे शिवरायांनी आधीपासूनच ठरवलेली पेटार्‍यांतून पसार होण्याची योजना प्रत्यक्षात आणली, तो दिवस होता शुक्रवार, दि. 17 ऑगस्ट 1666 असे शिवशाहिरांनी खास त्यांच्या शैलीत सांगताच संपूर्ण सभागृहाने ‘जय शिवाजी, जय भवानी’चा गजर केला. आग्रा येथील संपूर्ण मोहिमेच्या यशात मुख्य हेर बहिर्जी नाईक यांचे योगदान अत्यंत मोलाचे होते, असेही पुरंदरे यांनी नमूद केले.


जंजिरा अखेरीस कुणी जिंकला?
महाराष्ट्रातील कोळी बांधवांनी चौदाव्या शतकात बांधलेल्या जंजिर्‍याला आफ्रिकेतून आलेल्या हबशींनी जिंकले ते केवळ दगाबाजीने. व्यापारी असल्याचे सांगून बोटींमधून आणलेली दारू प्रथम कोळ्यांना पाजली आणि नंतर त्याच बोटींच्या पेटार्‍यांमध्ये लपलेल्या हबशांनी किल्ला बळकावला. त्यानंतर तो किल्ला ताब्यात घेण्यासाठी शिवरायांनी अतोनात प्रयत्न केले. त्यानंतरदेखील छत्रपती संभाजी, सरखेल कान्होजी आंग्रे, पेशवे, चिमाजीअप्पा, इंग्रज आदींनी तो हस्तगत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तब्बल पाचशे वर्षांहून अधिक काळ तो कुणालाच जिंकता आला नाही. अखेरीस तो भारत स्वतंत्र झाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी ताब्यात घेतला असे शिवशाहिरांनी सांगताच या किल्ल्याची अभेद्यताच बालकांच्या नजरेपुढे तरळून गेली.