आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘डोह’,‘दी मिथ’ भावले; लघुपटाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, दिग्दर्शकांनी साधला संवाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शॉर्ट फिल्म म्हणजे गंभीर काहीतरी, उपदेशाचे डोस वगैरे असा काहीसा अनेकांचा समज झालेला आहे. मात्र, जे काही सांगायचे आहे ते थोडक्यात आणि आटोपशीर सांगत रसिकांपर्यंतही ते व्यवस्थितपणे पोहोचवण्याचं हे उत्तम माध्यम असल्याचं तीनही लघुपटांनी दाखवून दिलं. त्यातही ‘डोह’ हा लघुपट रसिकांच्या विशेष पसंतीस उतरला. चित्रपट चावडी उपक्रमांतर्गत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे, प्रतिष्ठानच्या कार्यालयात तीन बहुचर्चित लघुपटांचे सादरीकरण करण्यात येणार आले.
अक्षय इंडिकर दिग्दर्शित डोह, जयेश आपटे दिग्दर्शित ‘द मिथ’ आणि विक्रांत बच्छाव दिग्दर्शित ‘खानाबदोश’ या लघुपटांचा यात समावेश होता. सुरुवातील ‘द मिथ’ हा लघुपट दाखविण्यात आला. नाशिकचाच दिग्दर्शक आणि संपूर्ण शूटही नाशिकमध्येच झालेल्या या लघुपटाचे हे पहिलेच स्क्रीनिंग होते. यात संस्कृतीच्या जगण्यातील प्रयोजनाचा नेमका अर्थ, संस्कृती म्हणजे नेमके काय? आणि त्यातून आजच्या बदलणा-या वास्तवाशी कितपत संबंध टिकून आहे यावर चित्रण आहे. तर दुसरीकडे उच्चभ्रू सुशिक्षितही आपल्या जगण्यात अंधश्रद्धेला किती स्थान देतात आणि त्याचे बळी पडतात याचे सुरेख चित्रण या लघुपटात मांडण्यात आले आहे. ‘डोह’ या लघुपटात नुकत्याच तारुण्यात पदार्पण केलेल्या तरुणीची कथा असून, तारुण्यात पदार्पण केल्यानंतर तिच्या वेगाने बदलणा-या भावविश्वाचा तरल वेध ‘डोह’मध्ये घेण्यात आला आहे. पहिल्यांदाच आलेला शारीरिक संबंध, पण तो अर्धवट राहिल्याने तिच्या मनातील गुंता, तिची स्वत:ची स्पेस शोधणे, विचारांचं वादळ, संभ्रम, द्वंद्व हे दाखविताना दिग्दर्शकाने या अवस्थेतील गूढपणाचे सौंदर्य टिपण्याचा चांगला प्रयत्न केला होता. टीनएजसाठी असलेला हा लघुपट पालकांच्याही विशेष पसंतीस उतरला. त्यामुळेच त्यांच्या मनातील काहूर दिग्दर्शकाने नंतर संवादाच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न केला. कारण या लघुपटात तिचा आलेला तरुणाशी शरीर संबंध, लोकलमधील तिची स्पेस, घरी आईशी नातं, आरसा, पाणी अशा अनेक गोष्टींची वीण होती. ती उपस्थितांना आपलीशी वाटत होती.
तर ‘खानाबदोश’ हा माहितीपटही रसिकांना चांगलाच आवडला. कोलकाता येथील नाट्यसंस्थेच्या प्रयोगशील कलाविष्काराचा वेध घेण्यात आला आहे. नाटक हे आता पूर्णत: व्यावसायिक झाले आहे. त्याचं स्वरूप मुळात पैसे कमवणं झालं आहे. पण कोलकाता येथील ही नाट्यसंस्था जनजागृतीचं काम नाटकांच्या माध्यमातून करते ते ही कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता. मग ते कलाकार हे सगळं करताना त्यांच्यात काय ऊर्जा असते, त्यांची मानसिकता काय, ते विस्थापितांसाठी हे काम करत असताना येणा-या अडचणी, केवळ कोलकाता येथेच नाही तर महाराष्‍ट्र, झारखंड, बिहार येथेही ही मंडळी नाटकांच्या माध्यमातून जनजागृती करतात. नाटकासाठी येणारा अवाढव्य खर्च वजा करून काही तरुण नाटक या माध्यमाचा एवढा चांगला उपयोग करतात, यामुळेच यावर लघुपट तयार करण्याची प्रेरणा मिळाल्याचे दिग्दर्शक विक्रम बच्छाव यांने या वेळी सांगितले.
यानंतर रसिकांनी या तीनही लघुपट दिग्दर्शकांशी संवाद साधत आपल्या मनातील शंकांना वाट मोकळी करून दिली. या तिघांनीही त्याची समर्पक उत्तरे दिली. विशेष म्हणजे लघुपट बघायलाही मोठी गर्दी झाली होती.