आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्याचे पाणी कुठे वळवले जाते दाखवाच, जलसंपदामंत्र्यांचे अाव्हान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मुसळधार पाऊस पडल्याने गंगापूर व इतर धरणातून साेडलेले पाणी नाशिक जिल्ह्यात इतरत्र वळवण्यात अाल्याचा अाराेप हाेत अाहे. मात्र, हा अाराेप खाेडून काढतानाच ‘पाणी कुठे वळवले हे दाखवाच?’ असे अाव्हान जलसंपदामंत्री व नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मराठवाड्यातील जलतज्ज्ञांना दिले अाहे.

मागील वर्षी पडलेल्या भीषण दुष्काळात काेर्टाच्या अादेशानंतर नगर व नाशिकच्या धरणातून जायकवाडी धरणात पाणी साेडण्यात अाले हाेते. त्यालाही या दाेन्ही जिल्ह्यांतील राजकीय पुढाऱ्यांनी तीव्र विराेध केला हाेता. या पावसाळ्यात नाशिक जिल्ह्यात जाेरदार पाऊस पडला असल्याने तेथील धरणे भरली अाहेत. मात्र, या धरणातून साेडलेले पाणी थेट मराठवाड्यातील जायकवाडी धरणात न येऊ देता ते कालव्यांद्वारे इतरत्र वळवले जात असल्याचा अाराेप मराठवाड्यातील लाेकांकडून हाेत अाहे. याबाबत महाजन म्हणाले की, ‘नाशिक जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणावर सर्वत्रच पाऊस पडत आहे. त्यामुळे पाणी कुठेही वळविण्याची आवश्यकता नाही. पुराचेच पाणी या कालव्यांतून वाहत आहे. दुसरीकडे खरिपाचे हे आवर्तन देऊ नये, असे कुठलेही आदेश नाहीच. त्यामुळे पाणी इतरत्र वळवल्याचा आरोपच अपुऱ्या माहितीचा आणि चुकीचा अाहे.’
सध्या साेडणेच नकाे
‘एमडब्ल्यूअारए’चा सन २०१४ सालचा निर्णय हायकोर्टाने रद्द केलेला नाही. त्यामुळे पावसाळ्यात पाणी साेडणे बंधनकारक नाही. १५ ऑक्टोबरलाच धरणांतील उपलब्ध पाण्याची माहिती घेऊन त्यावर निर्णय घेता येतो. तेव्हाच पाणी खाली सोडले जाईल. शिवाय खरिपाचे आवर्तन हे कायदेशीर आहे. ते थांबविता येणारच नाही. आताच पाणी जायकवाडीस सोडले आणि नंतर वरची धरणं भरली नाही तर खालून पाणी कसं आणणार?
राजेंद्र जाधव, अध्यक्ष, जलचिंतन संस्था
जायकवाडीत अातापर्यंत ३३ टीएमसी पाणी
यंदाच्या संपूर्ण पावसाळ्यात जायकवाडी धरणाला गुरुवारी सकाळी ६ वाजेपर्यंतच तब्बल ३३ टीएमसी पाण्याचा विसर्ग झाला आहे. मागील वर्षी दुष्काळी परिस्थिती असताना पाण्यावरून नाशिक- मराठवाडा वाद उद्भवला हाेता. परंतु जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात मुसळधार पावसाने ती चिंता काहीशी दूर केली. त्यानंतर संततधार सुरूच होती. ऑगस्टच्या पहिल्याच अाठवड्यात गाेदावरीला पूर अाला अाहे. त्यामुळे वरील धरणातून माेठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात अाला. त्यामुळे मराठवाड्यास तब्बल ३३ टीएमसी पाण्याचा विसर्ग झाला आहे. जुलै महिन्यात ९ टीएमसी पाणी जायकवाडीस सोडण्यात आले, तर एक ऑगस्टपासून विसर्गाचे प्रमाण हे सव्वा लाखापेक्षाही अधिक होते. त्यामुळे दोन-तीन दिवसांतच २४ टीएमसी पाणी नाशिकच्या नांदूर-मधमेश्वर बंधाऱ्यांतूनच गोदावरीमार्गे जायकवाडीला गेले. हे पाणी नाशिकमधील एकूण धरणांच्या साठवण क्षमतेच्या अगदी निम्मे आहे. शिवाय नाशिकमधील मोठ्या ७ अाणि मध्यम १६ अशा २३ प्रकल्पांत मिळून आजच्या स्थितीत ४० टीएमसी इतके पाणी उपलब्ध आहे.
अजूनही ८ टीएमसी पाणी दोन दिवसांत
गुरुवारी काही प्रमाणात पावसाने उसंत घेतली तरीही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरूच आहे. त्यामुळे पाण्याची आवक होतच असल्याने धरणांतून १ लाख क्युसेकपेक्षा अधिक वेगाने पाणी विसर्ग सुरूच ठेवला अाहे. म्हणजे अजूनही दाेन दिवसांत ७ ते ८ टीएमसी इतके पाणी जायकवाडीस विसर्ग हाेण्याची शक्यता अाहे.
- आर. एम. मोरे, अधीक्षक अभियंता व प्रशासक नाशिक
बातम्या आणखी आहेत...