आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sick Tushar Get Helps For Treatment, Three Lakh Collected

आजारी तुषारच्या उपचारांसाठी मदतीचे हात सरसावले; तीन लाख जमा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त असलेल्या सातवर्षीय बालकाला भरभरून आर्थिक मदत मिळण्यास सुरुवात झाली आहे. तीन दिवसांत कासार कुटुंबाच्या बँक खात्यावर 2 लाख 86 हजारांची मदत जमा झाली आहे. तुषारच्या शस्त्रक्रियेसाठी साडेचार लाखांवर खर्च येणार असल्याने आणखी मदत अपेक्षित आहे.
लाखामध्ये एखाद्याला होणा-या आजाराचा ‘धनी’ बनण्याचे दुर्भाग्य नाशकातील तुषार किरण कासार या सातवर्षीय चिमुकल्याच्या नशिबी आले आहे. चुंचाळे परिसरातील रहिवासी व कामगार असलेले किरण कासार यांचा तुषार हा मुलगा. त्याचे मूत्रपिंड जन्मत:च शरीराबाहेर होते. मुंबईच्या एका खासगी रुग्णालयात त्यावर उपचार करण्यात येऊन मूत्रपिंडाला शरीरात जागा करून देण्यात आली. तुषारवर सात शस्त्रक्रिया करण्यात आल्या. दरम्यानच्या काळात आतड्यापासून मूत्रपिंड तयार करून ते मुलाच्या शरीरात टाकण्यात आले. परंतु दुर्दैवाने तेदेखील कार्यरत होऊ शकले नाही. या उपचारांसाठी पालकांचे पैसे तर गेलेच; परंतु मुलाची प्रकृतीही खालावली. उपचारांसाठी घरदार विकल्यानंतरही त्यास यश आले नाही. इंटरनेटवरून तुषारच्या आजाराविषयीची माहिती समजल्यावर अहमदाबाद येथील इन्स्टिट्यूट ऑफ किडनी डिसीज अँड रिसर्च सेंटरने तुषारच्या आजाराचे आव्हान स्वीकारले. मात्र उपचारांसाठी किमान साडेचार लाख रुपये खर्च येणार आहे. इतका पैसा उभा करण्याची क्षमता आता तुषारच्या आई-वडिलांची नाही.
यासंदर्भात ‘दिव्य मराठी’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर समाजातील सर्वच स्तरांतून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत 2 लाख 86 हजार रुपयांचा मदतनिधी कासार कुटुंबीयांकडे जमा झाला आहे. त्यातील अनेकांनी त्यांच्या बॅँक खात्यात मदतीचे पैसे जमा केले. हा ओघ बघून तुषारचे आई-वडील भारावले.
यापूर्वी आपले बँकेचे पासबुक कधीही भरले नव्हते, अशी भावना त्याच्या आईने व्यक्त केली. देणगीदारांच्या या दिलदारपणामुळे तुषारच्या आयुष्याचेही ‘पासबुक’ विस्तृत झाल्याने अनेकांनी आनंद व्यक्त केला. अजूनही तुषारला साधारणत: दीड लाखांची आवश्यकता आहे. मदतीसाठी 7350538421 या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा किरण कासार यांच्या बॅँक ऑफ इंडियाच्या 082610110000861 या अकाउंट क्रमांकावर मदत द्यावी.
औरंगाबादेतून अकरा हजारांची मदत
औरंगाबाद ।नाशिकच्या तुषार किरण कासारसाठी औरंगाबादच्या सिडको एन-2 परिसरातील तरुणांनी अकरा हजार 265 रुपये जमा करून बँकेच्या खात्यात शुक्रवारी जमा केले आहेत. भाजप ओबीसी आघाडीचे शहर उपाध्यक्ष जनार्दन कापुरे, आरपीआय आठवले गटाचे जिल्हा संघटक अप्पाराव इंगोले, आरपीआय युवाचे शहराध्यक्ष अजय म्हस्के, मधुकर सोनटक्के, अनिल सोनाळे, प्रशांत वाकळे, संतोष नावकर, योगेश निकाळजे, संतोष सोनटक्के आदींचा समावेश आहे.