आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंद सिग्नलवर वाहतूक नियाेजनाची मदार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - दिवसेंदिवस वाढत्या लोकसंख्येमुळे शहरात वाहनांची संख्याही वाढल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. परिणामी, छोट्या-मोठ्या अपघातांचेही प्रमाण वाढत असून, वाहतूक व्यवस्था नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात अाहे. शहरांतर्गत वाहतुकीला शिस्त लागावी, अपघातसंख्या घटावी, यासाठी अनेक ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसविण्यात अाली अाहे. तसेच, काही अपघातप्रवण स्थळांवर नव्याने सिग्नल यंत्रणाही बसविण्यात अाली. मात्र, कित्येक महिन्यांपासून यातील अनेक सिग्नल बंदच आहेत.
काही सिग्नल्सवर वाहतूक पाेलिसच नाहीत, तर काही सिग्नल केवळ सुरू असून, त्याचे पालन वाहनचालकच करीतच नसल्याचे चित्र ‘डी. बी. स्टार’ने केलेल्या पाहणीत दिसून अाले. काेट्यवधी रुपयांचा खर्च करून बसविण्यात अालेल्या या सिग्नल यंत्रणा सुरू करण्यासाठी अपघातांचीच वाट का बघितली जाते, बंद सिग्नल यंत्रणा वाहनचालकांच्या जिवाशी खेळण्यासाठीच अाहेत काय, असे संतापजनक प्रश्नही अनेक नागरिक-वाहनचालकांनी ‘डी. बी. स्टार’कडे उपस्थित केले अाहेत.

द्वारका सर्कलवरील कोंडी काही केल्या सुटेना
उड्डाणपुलाच्या निर्मितीनंतर महामार्गावरील तसेच द्वारका परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल, अशी अपेक्षा हाेती. मात्र, ही समस्या अाजही कायम आहे. शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या या चाैकात सकाळी, तसेच सायंकाळच्या सुमारास तासन‌्तास वाहतूक काेंडी झालेली असते. ही समस्या साेडविण्यासाठी या ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसविण्यात अाली खरी; मात्र अद्यापदेखील ती कार्यान्वित करण्यासाठी प्रशासनाला अद्याप मुहूर्त लागलेला नाही. सातत्याने हाेणाऱ्या काेंडीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी ते वाहतूक पोलिसांची नेमणूक केली आहे. मात्र, तरीदेखील राेजच वाहतुकीचा बाेजवारा उडत असल्याने अाता लवकरात लवकर येथील सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी, अशी मागणी नागरिक-वाहनचालकांकडून केली जात आहे.

वाहतूकपोलिसांच्या अनुपस्थितीमुळे कोंडीत भर
सिग्नल यंत्रणा कार्यान्वित नसताना वाहतूक पाेलिसांकडून संबंधित ठिकाणी थांबून वाहतुकीला दिशा देण्याचे काम करणे अपेक्षित असताना, अनेक चाैकांमध्ये सिग्नल तर बंदच, परंतु वाहतूक पाेलिसही गायब असल्याचे दिसून अाले. त्यामुळे अशा चाैकांत वाट्टेल तेथून नियम ताेडून धाेकादायकपणे मार्गक्रमण केले जात असल्याचे दिसून अाले. यामुळे अनेकदा वाहतूक कोंडी हाेऊन अपघात घडतात. वाहतूक पोलिसांनी अशा ठिकाणी जातीने लक्ष देणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रियादेखील नागरिकांनी ‘डी. बी. स्टार’कडे दिल्या अाहेत.

जुना आडगाव नाका बनला धोकेदायक
जुना आडगाव नाका परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची वर्दळ सुरू असते. येथील सिग्नल यंत्रणाही बंद अवस्थेत असल्याने हा चौक धोकादायक बनला आहे. विशेष म्हणजे, वाहतूक पाेलिसांच्या गैरहजेरीमुळे सर्रासपणे नियम ताेडले जातात. त्यामुळे वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर येथील सिग्नल यंत्रणा तातडीने सुरू करावी, अशी मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे.

पांढरे पट्टे झाले गायब...
अनेक सिग्नलवरील पांढरे पट्टे गायब झाल्याचे ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत दिसून आले. अशा ठिकाणी वाहनचालक नियमांना डावलून रस्त्याच्या मध्यापर्यंत वाहने उभी करत असल्याने अपघात घडतात. अशा प्रकारांकडे वाहतूक पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे. सिंहस्थात अनेक ठिकाणी झेब्रा क्राॅसिंग, दुभाजक रंगरंगाेटीची कामे झाली, मात्र अल्पावधीतच पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती झाली अाहे.

वाहतुकीचे नियम धाब्यावर
प्रमुख चाैकांतही वाहनधारकांकडून वाहतुकीचे नियम धाब्यावर बसविले जात असल्याचे दिसून येते. सिग्नलच्या नियमांचे उल्लंघन करणे, सिग्नलवर पांढऱ्या पट्ट्यांच्याही पुढे वाहने उभी करणे, ‘नाे एंट्री’मध्ये प्रवेश करणे, ‘यूटर्न’ला बंदी असतानाही वळण घेणे असे प्रकार अनेकदा वाहतूक पाेलिसांसमाेर घडत असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने अपघातांचे प्रकार वाढत अाहेत.

प्रशांत वाघुंडे, उपायुक्त,वाहतूक शाखा
तिगरानिया चौफुलीवरील सिग्नलही बंद

महामार्गावरून वेगाने होणाऱ्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे तिगरानिया चौफुली धोकेदायक बनून त्या ठिकाणी अपघात वाढत हाेते. या ठिकाणी चाैफुलीवर वाहनांचा वेग कमी करण्यासाठी सौरऊर्जेवरील सिग्नल यंत्रणा बसविण्यात अाली. मात्र, कित्येक महिन्यांपासून ही सिग्नल यंत्रणादेखील बंदच आहे. परिणामी, छाेटे-माेठे अपघात नित्याचेच झाले अाहेत.

वडाळा नाका चौफुलीवर अद्यापही सिग्नलची प्रतीक्षाच
वडाळा नाका चौफुलीवरून रोजच छोट्या-मोठ्या वाहनांसह अवजड वाहनांचीही माेठी वर्दळ सुरू असते. तसेच, द्वारका, वडाळा नाका हा नागरी वस्तीचा भाग असल्याने पादचारी, सायकलस्वारांचीही संख्या माेठी असते. अशा परिस्थितीतही येथील सिग्नल यंत्रणा गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे. परिणामी, या ठिकाणी सातत्याने वाहतूक कोंडी हाेऊन पादचारी, वाहनधारकांना जीव मुठीत घेऊनच मार्गक्रमण करावे लागत असल्याचे ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत दिसून अाले. मुख्य म्हणजे, येथील सिग्नल यंत्रणा कार्यान्वित नसल्याने मुंबई नाका सर्कलवरही वाहतुकीचा ताण पडत असल्याने येथील सिग्नल सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून हाेत अाहे.

अल्पावधीतच सिग्नल यंत्रणेचा बाेजवारा...
मखमलाबाद रोडवर ड्रीम कॅसल परिसरात सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नव्याने सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली. या भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटून अपघात कमी हाेतील, वाहतुकीला शिस्त लागेल, अशी अपेक्षा असतानाच मुख्य पर्वण्या पार पडल्यानंतर अल्पावधीतच ही यंत्रणा बंद पडली. त्यामुळे वाहनचालक भरधाव वेगाने वाहने चालवत, नियम पायदळी तुडवत असल्याचे दिसून येत अाहे.

द्वारका परिसरातील सिग्नल यंत्रणा गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद असून, तिचा वापर जाहिरात फलक, बॅनर, शुभेच्छापत्रके लावण्यासाठी केला जात असल्याचा प्रकार ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत दिसून अाला. विशेष म्हणजे, महापालिका प्रशासनाने २६ जानेवारीपर्यंत शहर होर्डिंगमुक्त करण्यासाठी पावले उचलली असताना कुठल्याही प्रकारच्या कारवाईची भीती बागळता शहरातील अनेक सिग्नलवर जाहिराती लावल्या जात असल्याने पाेलिसांसह महापालिका प्रशासनालाही आव्हान दिले जात आहे.