आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंहस्थ कामे; गुणवत्ता तपासणीचे पालिकेसमोर आव्हान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने महापालिकेमार्फत सुरू असलेल्या ११०० कोटी रुपयांच्या कामांबाबत लोकप्रतिनिधींकडून तक्रारी येत असताना आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्यासमोर कामाची गुणवत्ता तपासणी कोणाकडून करून घ्यायची, असा पेच निर्माण झाला आहे.
सरकारी गुणवत्ता नियंत्रण करणाऱ्या संस्थांबाबतही प्रश्नचिन्ह उभे केले जात असल्यामुळे आरोपांचे नसते झेंगट पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर तूर्तास जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तपासणीचा निर्णय घेण्यात आला आहे.
कुंभमेळ्यासाठी शहरात साडेचारशे कोटीच्या रस्त्यांची कामे सुरू आहेत. यात रिंगरोडच्या कामांच्या दर्जाबाबत तक्रारी आहेत. डांबराचा कमी थर देणे, तळ मजबूत करणे आदींसह निकृष्ट साहित्य वापरल्याचेही आक्षेप आहेत. याबरोबरच साधुग्राममध्ये मूलभूत सुविधांसाठीची कामेही निकृष्ट असल्याचे आरोप आहेत. विशेषत: स्नानगृहासाठी जुनेच पत्रे वापरण्यासारखे प्रकार घडल्याने पावसाळ्यात गैरसुविधांमुळे साधू-महंतांचा रोष ओढवण्याचीही भीती आहे. दरम्यान, आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर गेडाम यांनी सिंहस्थ कामांची पाहणी केली होती. त्यानंतर कामांची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी केली जाईल, असे जाहीर केले होते. दरम्यान, कामे अंतिम टप्प्यात आल्यानंतर त्रुटींचा पाऊस पडू लागला असून, या पार्श्वभूमीवर कामाची गुणवत्ता तपासणी कोणामार्फत करायची असा पेच प्रशासनासमोर आहे.
दरम्यान, सद्य:स्थितीत महाराष्ट्र अभियांत्रिकी संसोधन संस्था (मेरी) सार्वजनिक बांधकाम खात्याच्या गुणवत्ता नियंत्रण विभागामार्फत तपासणीचा पर्याय असला, तरी याव्यतिरिक्त अनुभवी संस्थेचा शोध सुरू आहे.

योग्य निधी राखून ठेवण्यासाठीही प्रयत्न

अनुभवी संस्थेचा शोध सुरू असल्याचे आयुक्तांनी मान्य करीत लवकरात लवकर तपासणी केली जाईल, तसेच लेखी सूचना दिल्यास प्रत्यक्ष पाहणी करून दुरुस्तीचे आदेश दिले जातील, असे स्पष्ट केले. जिल्हाधिकारी जिल्हा नियोजन समिती अधिकाऱ्यांमार्फत तपासणीचा प्रयत्न असून, त्यासाठी वार्षिक योजनेतील पाच टक्के निधी राखून ठेवण्याची मागणी केली जाईल.