आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Silver Jubilee Of Yashwantrao Chavan Open University

...अन् सुरू झाली लगबग रौप्यमहोत्सवाची

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे रौप्यमहोत्सवी वर्ष सुरू होऊन चार महिने उलटल्यानंतरही रौप्यमहोत्सवी वर्ष समितीची बैठकच झाली नसून, यासंदर्भातील नियोजनाची बैठक झाली नसल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाला जाग आली आहे. त्यामुळे आठवडाभरात यासंदर्भात बैठक घेऊन वर्षभरातील उपक्रमांची रूपरेषा निश्चित केली जाणार आहे.

रौप्यमहोत्सवी वर्ष म्हणून कोणत्याही मोठय़ा संस्था, आस्थापनेकडून एकाहून एक सरस उपक्रमांचे आयोजन करून रौप्यमहोत्सवी वर्ष यादगार करण्याचे आणि त्यानिमित्ताने संस्थेचे ‘ब्रॅण्डिंग’ करण्याचे प्रयत्न केले जातात.

1 जुलैला रौप्यमहोत्सवी वर्षाची घोषणा केल्यानंतर मुक्त विद्यापीठाला त्या घोषणेचाच विसर पडल्याचे दिसून येत होते. तीन-चार महिने उलटूनही रौप्यमहोत्सवी वर्ष समितीची बैठकच झालेली नव्हती. त्यामुळे सर्वप्रथम आठवडाभरात बैठक घेऊन विविध उपक्रम आणि त्यांच्या तारखांची निश्चिती होणार आहे. यामुळे मात्र या महोत्सवात सहभागी होणार्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे.

या उपक्रमांचे होणार आयोजन
रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त विविध मान्यवरांची चर्चासत्रे, परिसंवाद, क्रीडामहोत्सव, शैक्षणिक विषयांवरील स्पर्धा, मॅरेथॉन, ग्रंथपाल कार्यशाळा, दूरस्थ शिक्षणपद्धतीच्या ग्रंथालय सेवा कार्यशाळा यांसारख्या उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. त्यामुळे निदान आता उर्वरित आठ महिन्यांत तरी विविध प्रकारचे उपक्रम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


बैठकीद्वारे लवकरच उपक्रमनिश्चिती
काही उपक्रमांबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, त्याबाबत लवकरच बैठक घेऊन निश्चिती केली जाणार आहे. संबंधितांच्या बैठकीनंतर तारखांचीही निश्चिती केली जाणार आहे. राजेंद्र वडनेरे , प्रभारी कुलसचिव