आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंहस्थ निधी खर्चावरून राजकीय आखाडा तापणार, राज यांचा दावा फोल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सिंहस्थ कुंभमेळ् याची कामे बघून सुखावलेल्या राज ठाकरे यांनी राज्य सरकारने निधी वितरणाबाबत दुर्लक्ष केल्याची टीका केल्यानंतर आता हा श्रेयवाद मनसेच्याच अंगलट येण्याची शक्यता आहे. आतापर्यंत राज्य सरकारने ४८७ कोटी रुपयांचा निधी महापालिकेला दिला असून, याउलट महापालिकेने सिंहस्थासाठी केवळ १२७ कोटी रुपयेच खर्च केले आहेत. एकूणच परिस्थितीत राज्य सरकारच्या तिजोरीतून आलेल्या महापालिकेपेक्षा जवळपास साडेतीनपट निधीतून सिंहस्थाची कामे मार्गी लागल्याचे स्पष्ट होत आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याला ध्वजारोहणाने मंगळवारी (दि. १४) सुरुवात होत असताना त्याच्या पूर्वसंध्येला नवीन वाद पेटण्याची चिन्हे आहेत. या वादाची ठिणगी ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना केलेल्या वक्तव्यामुळे पडली असून, राज यांनी शनिवारी सिंहस्थाच्या कामासाठी केंद्र राज्य सरकारने पुरेसा निधी दिला नसल्याकडे लक्ष वेधले होते. महापालिकेच्या माध्यमातून सर्व कामे झाली असल्यामुळे मनसेकडूनच ब्रँडिंग होत असल्याचे श्रेयही घेतले होते. दरम्यान, लेखा विभागाकडून घेतलेल्या माहितीनुसार सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ११०० कोटी रुपयांचा आराखडा मंजूर झाला असून, यातील ७५ टक्के निधी राज्य शासन, तर २५ टक्के निधी महापालिकेमार्फत उपलब्ध होणार आहे. सद्यस्थितीत राज्य शासनाकडून ४८७ कोटी रुपये उपलब्ध झाले असून, अद्याप २०२ कोटी रुपये निधी येणे बाकी आहे. एकूण ६८९ कोटी रुपये राज्य शासनाकडून उपलब्ध होणार असून, महापालिकेचा विचार केला, तर जवळपास ४११ कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. त्यातील १२७ कोटी रुपये पालिकेचे खर्च झाले. यातही ५६ कोटी सिंहस्थ कामांसाठी, तर ७१ कोटी भूसंपादनासाठी खर्च झाले आहेत. लेखा विभागाच्या आकडेवारीमुळे आता अधिकारीही चक्रावले असून, सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शासनाने जादा अनुदान देऊनही महापालिकेच्या माध्यमातून मनसेला श्रेय देण्याचा प्रयत्न राज यांनी कोणाच्या माहितीच्या आधारे केला, असाही सवाल केला जात आहे.

शासनाने दिला असा निधी
- ३०मार्च २०१३ कोटी
- फेब्रुवारी २०१४ २१८ कोटी
- १६ फेब्रुवारी २०१५ ७५ कोटी
- मे २०१५ ४० कोटी
- २२ जून २०१५ १५० कोटी

मनसेची पुन्हा भाजप सरकारवर टीका
शनिवारीराज ठाकरे यांनी केलेल्या टीकेवरून वाद शमत नाही, तोच सोमवारी पुन्हा मनसे प्रवक्ते संदीप लेनकर यांनी प्रसिद्धिपत्रक काढून भाजप सरकारवर सिंहस्थ निधीवरून शरसंधान साधले. एक वर्षाने भरणा-या उज्जैनच्या कुंभमेळ्याची माहिती केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर आहे. मात्र, नाशिकमधील सिंहस्थाची माहिती नाही. हा एकप्रकारे महाराष्ट्रातील उत्सवांची माहिती डावलण्याचा प्रयत्न आहे. अलाहाबाद कुंभमेळ्यासाठी राज्य शासनाने १६०० कोटी रुपयांचा निधी दिला. नाशिकमधील कुंभमेळ्यासाठी जेमतेम १०० कोटीच मिळाले आहेत. राज्य शासनाने ७५ टक्के निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी घेतली असली, तरी प्रत्यक्षात त्या अनुषंगाने निधी मिळालेला नाही. नाशिकमधील जनताही केंद्र राज्य सरकारला कर भरत असल्यामुळे त्यांच्याबाबत दुजाभाव करण्याचे राजकारण करू नये, असा टोलाही लेनकर यांनी लगावला आहे.