आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोदावरी घाटस्थितीसाठी "सिम्युलेशन मॉडेल'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरीवर सात ठिकाणी घाट बांधण्यात येत असून, कुंभमेळ्यादरम्यान नदीपात्रात पाणी कमी-जास्त झाल्यास उद‌्भवणाऱ्या परिस्थितीचा सिम्युलेशन मॉडेलद्वारे अभ्यास केला जाणार आहे. जलसंपदा विभाग प्रस्तावित घाटांच्या ठिकाणी ऑगस्ट व सप्टेंबरच्या कालावधीतील गोदावरीच्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी खडकवासला येथील केंद्रीय जलसंशोधन केंद्राकडे (सीडब्ल्यूआरसी) अभ्यासासाठी पत्रव्यवहार करीत आहे.

गोदावरीच्या उजव्या बाजूला टाळकुटेश्वर ते कन्नमवार पूल (४३० मीटर), कन्नमवार पुलाच्या बाजूला (४०० मीटर), लक्ष्मीनारायण पुलाच्या बाजूस (४०० मीटर), डाव्या बाजूला लक्ष्मीनारायण पूल ते कपिला संगमादरम्यान (२६० मीटर), उजव्या तीरावर टाकळी येथे (४०० मीटर) दसक-पंचक येथे डाव्या व उजव्या बाजूला (४०० मीटर) घाट बांधण्यात येत अाहेत. केंद्राकडून घाटाबाबतची सर्व माहिती संकलित केली जात असून, लवकरच हा अभ्यास करणे शक्य हाेईल, असे उपजिल्हाधिकारी तथा सिंहस्थ कुंभमेळा अधिकारी महेश पाटील यांनी सांगितले.

या बाबींचा होतो सिम्युलेशन मॉडेलने अभ्यास
मेरीच्या धर्तीवर खडकवासला येथे केंद्र सरकारचे जल संशोधन केंद्र आहे. संस्थेकडे सिम्युलेशनच्या अभ्यासाची मॉडेल आहेत. नदीपात्रात पाणी वाढले, त्यात धरणातून सोडलेल्या पाण्याची भर पडल्यानंतर पात्र व घाटाची काय स्थिती होईल, त्या परिस्थितीत काय केले पाहिजे, पात्रातील व घाटावरील पाणी कमी झाल्यास काय चित्र असेल व अशा परिस्थितीत तसेच घाटावर क्षमतेपेक्षा अधिक गर्दी झाल्यास उद‌्भवणारी परिस्थिती कशा पद्धतीने हाताळावी, याचा अभ्यास सिम्युलेशन मॉडेलच्या आधारे केला जातो.