आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंहस्थात यज्ञांचे स्वरूप, वर्गीकरण अन‌् व्यवस्था

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुंभमेळ्यात केल्या जाणाऱ्या विविध धार्मिक उपक्रमांमध्ये यज्ञाला अत्यंत महत्त्व असते. कुंभपर्वात दाखल हाेणाऱ्या प्रत्येक अाखाड्यात काही विशेष यज्ञ करण्याचीही प्रथा अाहे. मग अशा विशेष यज्ञांसाठी वैशिष्ट्यपूर्ण समिधांचाही वापर केला जाताे. या विशेष यज्ञ अाणि त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण अाहुतींच्या परंपरेबाबत संबंधित अाखाडे प्रचंड अाग्रही असल्याचे दिसून येतात.

विश्वाची उत्पत्तीच यज्ञसदृश प्रक्रियेतून झाल्याचा उल्लेख ऋग्वेदात असल्याचे सांगितले जाते. यजुर्वेदात यज्ञाला विष्णू मानून ते एक सर्वाेत्तम कार्य असल्याचे म्हटले अाहे. अथर्ववेदात यज्ञाला विश्वाचे नाभीस्थान म्हणून त्याचे श्रेष्ठत्व नमूद करण्यात अाले अाहे. स्वर्ग, पुत्र, पशू, आरोग्य, ऐश्वर्य, पापनाश तसेच इष्ट फलांच्या प्राप्तीसाठी अग्नी, इंद्र अाणि अन्य इष्ट देवतांना उद्देशून अग्नीमध्ये समंत्रक आहुती अर्पण करण्याचे धार्मिक कर्मकांड यालाच यज्ञ संबाेधले जाते. यज्ञ हा शब्द यज् या संस्कृत धातूपासून बनला असून, त्याच धातूपासून बनलेले यजन, याग व इष्टी हे शब्दही यज्ञ या अर्थाने वापरले जातात.

मानवाच्या मंगलासाठी यज्ञ
पाैराणिक काळापासून हिंदू धर्मात कर्मकांडाला प्रारंभ झाल्याचे मानले जाते. त्यात केल्या जाणाऱ्या प्रमुख धार्मिक विधींपैकी यज्ञ हा प्रमुख मानला गेला अाहे. यज्ञ हे समस्त मानवजातीचे हित साधले जावे, इच्छित ध्येयप्राप्ती निर्विघ्न व्हावी, वातावरणाची शुद्धी यासह विविध कारणांनी अायाेजित केले जातात. ज्या यज्ञाचे प्रमुखपद जितक्या श्रेष्ठ साधू, महंताकडे तसेच जितके अधिक साधक तितके त्याचे अधिक फल असल्याचे मानले जाते.

वेदी, विहार अन् अाहुती
यज्ञासाठी निवडलेल्या भूमीला विहार असे म्हणतात. तेथे विशिष्ट पद्धतीने यज्ञमंडप उभारलेला असतो. दर्शपूर्णमास इष्टी, सोमयाग इत्यादींसाठी निवडलेल्या विहाराचे क्षेत्र वेगवेगळे असते. त्यानुसार यज्ञमंडपाचे स्वरूपही बदलते. अग्नीमध्ये आहुती देण्यासाठी आणलेली हविर्द्रव्ये यज्ञमंडपामध्ये विशिष्ट आकाराच्या ज्या जागेवर ठेवली जातात, त्या जागेस वेदी असे म्हणतात. वेदीची सीमा दर्शविण्यासाठी तिच्या कडेने सर्व बाजूंनी विटा रचून किंचित उंचवटा केलेला असतो. ही वेदी दर्भाने आच्छादिलेली असते. आहुतीचा स्वीकार करण्यासाठी देवता या दर्भाच्या आसनावर येऊन बसतात, असे मानले जाते.

यज्ञांचे वर्गीकरण
जाणकारांकडून यज्ञांचेही वर्गीकरण करण्यात अाले अाहे. वेदांचे अध्ययन अाणि अध्यापनासाठी ब्रह्मयज्ञ, पितरांची पूजा अाणि तर्पणासाठी पितृयज्ञ, देवतांच्या पूजा-अर्चनेसाठी देवयज्ञ, सर्व प्राण्यांप्रति असलेल्या भूतदयेपाेटी केला जाणारा भूतयज्ञ यासारखेदेखील त्यांचे वर्गीकरण केले जाते. त्याशिवाय जनसामान्यांमध्ये विवाह, यज्ञाेपवित संस्कार, सत्यनारायण, गृहप्रवेश, नवरात्रीवेळी यज्ञांचे अायाेजन केले जाते.

यज्ञसंस्थेचे स्वरूप
देवतेला अनुकूल करून घेण्यासाठी आहुती देणे, देवतांच्या गरजा मानवांसारख्या असतात असे मानून वस्तू अर्पण करणे, देवतेने परतफेड करावी म्हणून वस्तू वाहणे, पीडादायक देवतेला दूर ठेवण्याच्या हेतूने तिच्यासाठी बळी देणे, जे देवतेकडून मिळाले आहे ते तिलाच परत करणे, असे यज्ञसंस्थेचे स्वरूप असल्याचे मानले जाते.

यज्ञ अायाेजनातील व्यवस्था
यज्ञ जेव्हा माेठ्या प्रमाणात अायाेजित केले जातात, तेव्हा त्या यज्ञांसाठी काही विशेष व्यवस्था केली जाते. त्यानुसार यज्ञाच्या प्रमुखाला ब्रह्मा किंवा अधिष्ठाता म्हणून संबाेधले जाते. यज्ञासाठीच्या सर्व बाबींची पूर्तता करणे हेच त्याचे कर्तव्य असते. ज्या प्रमुख पुराेहिताच्या मार्गदर्शनाखाली यज्ञ हाेताे, त्याला अध्वर्यू संबाेधले जाते. वेदमंत्रांचे उच्चारण करणाऱ्यांना ‘हाेता’ अर्थात ‘ऋत्विज’ असे संबाेधले जाते. स्वर्ग, पुत्र, ऐश्वर्य, आरोग्य, दीर्घायुष्य, विजय, प्रतिष्ठा, अन्न, संरक्षण, पापनिवारण अशा प्रकारचे फल प्राप्त व्हावे, अशा इच्छेने विधिपूर्वक यज्ञाचे अनुष्ठान करणाऱ्यास यजमान म्हणतात. यज्ञाचा खर्च करण्याची जबाबदारी यजमानाची असते. त्याची पत्नी ही त्याची सहधर्मचारिणी असल्यामुळे यज्ञाच्या अनुष्ठानात असल्याने स्वाभाविकच यजमानासह पत्नीलाही यज्ञाचे फल मिळते.
बातम्या आणखी आहेत...