आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sinhasth Kubhmela News In Marathi, Nashik, Divya Marathi

वेध सिंहस्थाचे: सिंहस्थ कामांना येणार पावसाळ्याचा अडसर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांना उशिरा सुरुवात झाली असतानाच आता पावसाळ्यामुळे यातील अनेक कामांना काही काळासाठी थांबवावे लागणार आहे. त्यामुळे ही कामे वेळेत पूर्ण करण्याचे मोठे आव्हान महापालिका प्रशासनापुढे उभे ठाकले आहे. सद्यस्थितीत रस्त्याची कामे प्रगतिपथावर असून, त्यानंतर जलवाहिन्या, मलजलवाहिन्यांची कामे सुरू आहेत. आरोग्य आणि स्वच्छतेसंदर्भातील कामांना अद्याप हातही लावण्यात आलेला नाही.

वर्षावर येऊन ठेपलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांना शहरात सर्वत्र सुरुवात झाली आहे. राज्य शासनाने 1 हजार 52 कोटींच्या सिंहस्थ आराखड्याला मंजुरी दिली आहे. त्यातील 852 कोटी विकासकामांसाठी तर 202 कोटी भूसंपादनासाठी वापरली जाणार आहे. सिंहस्थ आराखड्याच्या मंजूर निधीच्या एकतृतीयांश अर्थात 33 टक्के निधी राज्य सरकारकडून महापालिकेस अदा केला जाणार आहे. म्हणजे राज्याकडून सुमारे सव्वा तीनशे कोटी महापालिकेला मिळणार असून, त्यातील सव्वादोनशे कोटींचा निधी आतापर्यंत महापालिकेस प्राप्त झाला आहे. त्यात रस्ते विकास, पाणीपुरवठा, भूसंपादन, मलनिस्सारण व्यवस्थापनाच्या कामांना सुरुवात झाली आहे.
ही कामे वर्षभरात पूर्ण करावयाची आहेत. परंतु, पावसाळ्याचा काळ आणि विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता याचा अडसर या कामांमध्ये येण्याची शक्यता आहे. अर्थात निविदा प्रक्रिया पावसाळ्यातच पूर्ण केल्यास कामांना सुरुवात होऊन आचारसंहितेचा अडसर येणार नाही. त्यादृष्टीने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पूर्वतयारीच्या आढावा बैठकीत प्रशासनाला आदेश दिलेले आहेत. सिंहस्थ कामांमध्ये रस्ते विकास कामांनी आघाडी घेतली आहे.

नियोजनाप्रमाणे जानेवारी 2015 पर्यंत रस्ते विकासाची कामे पूर्ण करण्यात येणार आहेत.
पाणीपुरवठा आणि मलजल वाहिन्यांच्या केंद्राच्या कामांनाही सुरुवात झाली आहे. मात्र मलनि:सारण केंद्राबाबतचे वाद न्यायप्रविष्ट असल्याने सिंहस्थापर्यंत ही केंद्र पूर्णत्वास येण्यास अडचणी येणार आहेत. उर्वरित सार्वजनिक स्वच्छता व वैद्यकीय सुविधा, विद्युत विषयक कामे आदींना सुरुवात होणार आहे. या कामांसंदर्भातील निविदा कधी निघणार आणि प्रत्यक्षात कामाला सुरुवात कधी होणार याबाबही संभ्रमावस्था आहे.

केंद्राच्या निधीकडे लक्ष
राज्य शासनाने केंद्र सरकारला 2 हजार 378 कोटींचा सिंहस्थ आराखडा सादर केला आहे. अलाहाबाद कुंभमेळ्यासाठी केंद्राने 1200 कोटींच्या आराखड्यास मंजुरी दिली आहे. त्या धर्तीवर नाशिकमध्येही तितक्याच निधीला मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा प्रशासनाला आहे. हा निधी केंद्राकडून आल्यास महापालिकेवरील मोठा भार कमी होणार आहे. या निधीसंदर्भात तत्कालीन ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्याबरोबर नाशिकचे शिष्टमंडळ चर्चा करणार होते. परंतु, दुर्दैवाने मुंडे यांचे निधन झाल्याने ही बैठक रद्द झाली. आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करण्याची तयारी भाजपच्या पदाधिकार्‍यांनी केली आहे. ही बैठक जूनच्या आत झाल्यास महापालिकेच्या दृष्टीने पुढील निर्णय तातडीने घेणे सोयीचे होईल, अशी अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.