आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sinhasth Kubhmela News In Marathi, Nashik, Narendra Modi, Divya Marathi

सिंहस्थासाठीचे नियोजन असावी निरंतर प्रक्रिया... तरच येतील अच्छे दिन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आर्थिक, भौगोलिक, सामाजिक प्रगती, सर्वंकष विकास या मुद्यांवर प्रचाराचा रोख ठेवणारे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करत लोकांनी भाजप आघाडीला स्पष्ट बहुमत दिले. साहजिकच, नव्या सरकारकडून प्रत्येक समाजघटकाला मोठ्या अपेक्षा आहेत. वेगाने वाढीच्या बाबतीत तर आपले नाशिक जगात सोळाव्या स्थानावर आहे. त्या अनुषंगाने येथील विविध क्षेत्रांसाठी नव्या सरकारने काय पावले उचलावीत, त्याचा धांडोळा...

कुंभमेळा म्हणजे नाशिकच्या आणि नाशिककरांच्या आयुष्यात दर बारा वर्षांनी येणारा महासोहळा आहे. बारा वर्षांनी भरणा-या कुंभमेळ्याच्या तयारी व नियोजनाच्या बैठका अवघे 10-12 महिने शिल्लक राहिले असताना करणे म्हणजे नियोजन या शब्दाचीच थट्टा असल्याचे मत सिंहस्थाशी निगडित मान्यवरांनी व्यक्त केले.
त्यामुळे सर्वप्रथम सिंहस्थाचे नियोजन किमान चार -पाच वर्षे आधीपासून करा, त्यानुसार कामकाजाची प्रक्रिया प्रारंभ होण्यास तीन वर्षे आणि कायमस्वरूपीची प्रमुख कामे पूर्ण होण्यास दोन वर्षांचा काळ, अखेरच्या टप्प्यातील कामे सहा महिन्यांत करून उर्वरित सहा महिन्यांत सर्व कामांची गुणवत्ता तपासणी आणि उणीव असल्यास संबंधित ठेकेदाराकडून त्या कामांची परिपूर्णता अशा स्वरूपाचे नियोजन अपेक्षित असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. नाशिकमधील सिंहस्थाच्या कामांचे नियोजन दूरच अद्याप तपोवनातील जागेबाबतचा निर्णय, शाहीमार्गाबाबतचा वाद आणि त्यावरील अतिक्रमणांचा प्रश्नदेखील महापालिकेच्या धुरिणांना आणि जिल्हा प्रशासनाला सोडवता आलेला नाही. त्यामुळे ऐनवेळी आखाड्यांनी काही पवित्रा घेतल्यास व त्यातून काही गंभीर समस्या उद्भवल्यास परिणाम काय होतील, त्याचाही विचार करण्याची गरज आहे. आता हाताशी असलेल्या वेळेत झटपट आणि चांगल्या दर्जाची कामे करून सिंहस्थ पार पाडावा इतकीच अपेक्षा आहे.

असा होणार आहे कुंभमेळा
03 आखाडे वैष्णवांचे नाशिकला
10 आखाडे शैव पंथाचे त्र्यंबकेश्वरला
14 जुलै 2015 ला ध्वजारोहण
19 ऑगस्ट 2015 आखाड्यांचे ध्वजारोहण
29 ऑगस्ट 2015 रोजी होणार पहिले शाहीस्रान
13 सप्टेंबर 2015 रोजी दुसरे शाहीस्रान
18 सप्टेंबर 2015 रोजी तिसरे शाहीस्नान
11ऑगस्ट 2016 ध्वजपर्व समाप्ती

कुंभमेळ्यासाठी असा मिळणार निधी
620 कोटी रुपये जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत वितरित केले जाणार
423 कोटी रुपये जिल्हा प्रशासनाकडे आले आहेत.
239 कोटी रुपये विविध विभागांना वितरित झाले आहेत.
90लाखांहून अधिक भाविक येण्याची शक्यता

या आहेत केंद्र शासनाकडून अपेक्षा
> केंद्र शासनाने प्रत्येक सिंहस्थासाठी एकसमान निधी देण्याचे धोरण ठरवून त्यानुसारच निधीचे वितरण करावे.
> केंद्राकडून दिला जाणारा निधी हा संबंधित सिंहस्थाच्या आधी किमान तीन वर्षे त्या राज्याकडे सुपूर्द झाल्यास कामांना गती शक्य.
> केंद्र शासनाचा निधी हा त्या सिंहस्थातील कायमस्वरूपीच्या कामांसाठी वापरला जावा, अशीच त्याची तरतूद करावी.
> केंद्राकडून दिल्या जाणा-या निधीचे कुंभमेळा सुरू होण्यापूर्वी ऑडिटदेखील करण्याची तरतूद केल्यास कामे प्रत्यक्षात होतील.
> देशातील नद्यांसाठी जसा जलआयोग आहे, त्याप्रमाणे देशातील चार ठिकाणच्या कुंभमेळ्यांसाठी स्वतंत्र समितीचे गठन करावे.
> गंगासफाई मंत्री अशा नवीन मंत्रालयाप्रमाणेच चार कुंभमेळ्यांसाठी स्वतंत्र मंत्रालय, स्वतंत्र यंत्रणेचे गठन करावे.
> साधू, संत, महंतांशी समन्वय राखणा-या कुंभमेळा अधिका-याची पदनिर्मिती कायमस्वरूपी केली जावी.
> रेल्वेकडे केवळ सिंहस्थासाठी स्वतंत्र निधी आणि गाड्यांची तरतूद करण्याचे अधिकार आणि व्यवस्था असावी.

अशा पूर्ण होऊ शकतात अपेक्षा
> प्रत्येक कुंभमेळ्याला केंद्र सरकार किती मदत करणार, त्याचा आकडा जाहीर करून नियोजनबद्धतेने त्याचे वितरण व्हावे.
> निधी तीन वर्षे आधीच देण्यासाठी केंद्र सरकारच्या बजेटमध्ये तीन -चार वर्षे आधीच तरतूद करणे शक्य.
> संबंधित विभागातील रस्ते, पूल, नदीस्वच्छता, तटबंदी आणि पायाभूत सुविधांसाठीच निधी देण्याची तरतूद कायद्यात करावी.
> सिंहस्थ कामांच्या देखरेख आणि ऑडिटसाठी स्वतंत्र यंत्रणेची तरतूद करून त्यामार्फत नियमित आढावा घेतला जावा.
> कुंभमेळा होणा-या प्रत्येक राज्यात कुंभमेळा आयोगाच्या स्थापनेचे आदेश केंद्र सरकारकडून दिले गेल्यास आयोग निर्मिती शक्य.
> केंद्रीय स्तरावर कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र मंत्रालय किंवा संपूर्णपणे स्वयंचलित यंत्रणा निर्माण झाल्यास कामकाजाला गती देणे शक्य.
> कुंभमेळा अधिकारी या पदासाठी आयएएस दर्जाच्या अधिका-याची नियुक्ती करण्याचे आदेश देऊन ते पद पूर्ण काळासाठी ठेवावे.
> रेल्वेमंत्र्यांकडून दरवर्षी सादर केल्या जाणा-या अर्थसंकल्पात कुंभमेळ्यासाठीच्या स्वतंत्र निधीची घोषणा करून पूर्तता व्हावी.

वर्षभर या जागा दिल्या जाव्यात
साधुग्राम ही नाशिकच्या सिंहस्थासाठीच्या साधुग्रामची प्रमुख समस्या आहे. त्यामुळे सर्वप्रथम हीच समस्या सोडविण्यासाठी केंद्र शासनाने बाजारभावाप्रमाणे राज्य शासनाला निधी द्यावा. शेतक-यांचे कोणतेही नुकसान न होता, ही 350 एकर जागा आरक्षित होऊन कायमस्वरूपीचे सिंहस्थ साधुग्राम उभारावे. धार्मिक उपक्रमांसाठी वर्षभर या जागा दिल्यास त्यातून साधुग्रामच्या वार्षिक रखरखावाचा प्रश्नदेखील मार्गी लागू शकतो. तसेच शाहीमार्गांचे आणि नदीलगतच्या रस्त्यांचे रुंदीकरण आणि ते अतिक्रमणमुक्त करणे आवश्यक आहे. गंगा नदीप्रमाणेच गोदावरी प्रदूषण मुक्तीसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापना करून कृतीगट स्थापन करावेत. तसेच नाशिकमध्ये येणा-या भाविकांसाठी धर्मशाळांचे कमर्शिअलायजेशन रद्द करून भाविकांची सोय करावी. - सतीश शुक्ल, अध्यक्ष, पुरोहित संघ

काय म्हणतात
धार्मिक व प्रशासकीय क्षेत्रातील जाणकार
तपोवनात सिंहस्थासाठी कायमस्वरूपी किमान तीनशे एकर जागा राखणे अत्यावश्यक आहे. मात्र, या सर्वाधिक प्रमुख मुद्यावर कोणताही निर्णय घेण्याऐवजी कालापव्यय करण्यातच स्थानिक नेते आणि जिल्हा प्रशासन धन्यता मानत आहेत.
साधुग्रामसाठी केंद्राकडून निधी मिळावा
मागील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या प्रसंगी केंद्र शासनाने 100 कोटी रुपयांचा निधी दिला होता. त्याप्रमाणे यंदाच्या सिंहस्थातदेखील साधुग्रामसाठी केंद्र शासनाने तातडीने निधी देण्याची गरज आहे. तसेच, सिंहस्थासाठी कायमस्वरूपीची यंत्रणा उभी करून केल्या जाणा-या कामांची मजबुती जोखणारी व्यवस्था निर्माण करावी. तसेच संत, महंत, साधूंसमवेत समन्वय राखण्यासाठी कायमस्वरूपी कुंभमेळा अधिका-याच्या पदाची निर्मिती करावी. - महंत सुधीरदास महाराज
सर्व मूलभूत सुविधांचा
विकास व्हावा
नाशिकसह त्र्यंबकमधील कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जी काही कामे होतील, ती स्थायी स्वरूपाची असावीत. अशा कायमस्वरूपीच्या कामांसाठी आणि मूलभूत सोयीसुविधांसाठी केंद्र शासनाकडून निधी मिळणे अत्यावश्यक आहे.
स्वामी संविदानंद महाराज
त्र्यंबक सर्वच स्तरावर परस्वाधीन
नाशिकप्रमाणे त्र्यंबककडे स्वत:चा निधी नसल्याने येणारा निधी सर्वप्रथम त्र्यंबकला मिळणे आवश्यक आहे. तसेच त्र्यंबकेश्वरी भरणारा कुंभमेळादेखील तितकाच महत्त्वाचा असल्याने निधी देताना समसमान मिळाल्यास तो समान न्याय ठरू शकणार आहे. यशदा अडसरे, नगराध्यक्षा, त्र्यंबक
जागेचा विस्तार करून पुरेशा सुविधा द्याव्यात
गत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या वेळी जमलेल्या भाविकांपेक्षाही दुप्पट भाविक नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला या वेळी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागेसह सर्व अत्यावश्यक सुविधा केंद्रे शासनाने पुरेशा प्रमाणात देणे आवश्यक आहे. पाणी, रेशन, तंबू आणि वीज या बाबींची पूर्तता तर त्यासाठी अगदी प्राथमिक गरज असून त्यात कोणतीही तडजोड करण्यात येऊ नये. तसेच सुरक्षेचीदेखील चांगली व्यवस्था होणे अत्यावश्यक आहे. - रामसनेहीदास महाराज