नाशिक- सिंहस्थकुंभमेळ्यासाठीची रस्ते, पूल आणि घाटबांधणी ही कामे आताच सुरू करणे आवश्यक आहे. ही वेळखाऊ कामे आताही सुरू आहेत. नव्याने काढाव्या लागणाऱ्या निविदांची जी कामे आहेत ती पुढील सात महिन्यांत पूर्ण होणार असल्याने शिवाय पावसाळ्यात त्यातील कुठलीच कामे सुरू करता येणार नसल्याने आचारसंहिता नसती तरीही कामे ऑक्टोबरनंतरच सुरू होणार होती, त्यामुळे आचारसंहितेचा सिंहस्थाच्या कामांवर कुठलाही परिणाम होणार नसल्याचे अपर जिल्हाधिकारी कुंभमेळा यांनी स्पष्ट केले.
आधीच सिंहस्थांच्या कामांना विलंब झाला असून, अवघ्या सात महिन्यांत सर्व कामे कशी पूर्ण होणार, सिंहस्थाचे नियोजन बिघडते की काय, अशी शंका उपस्थित केली जात आहे. त्यात पावसाळ्यात तीन-चार महिने व्यर्थ गेले असून, आता कुठे कामे करण्यास मुहूर्त लागण्याची शक्यता असताना महिनाभराची विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता त्यात अडसर ठरली. त्यामुळे कामे महिनाभर विलंबाने सुरू होण्याचे संकटही ओढवले होते. मात्र, असे काहीही होणार नसून, कामे विलंबाने सुरू होण्याचा प्रश्नच नाही. आचारसंहिता ज्या कालावधीत आहे त्या कालावधीत वेळखाऊ कामे सुरूच करता येणार नाही. कारण रस्ता, पूल किंवा घाटबांधणी ही कामे तशीही पावसाळ्यात सुरू करण्यास यंत्रणा उत्सुक नसतेच. कारण पावसामुळे पुन्हा ती कामे करण्याची वेळ येत असल्याने आणि गेल्या दोन वर्षांचा अनुभव पाहता 28 ऑक्टोबर पर्यंत पाऊस पडला असल्याने संबंधित यंत्रणांनी ऑक्टोबर नतंरच कामे सुरू करण्याचे नियोजन संबंधितानी केले आहे, तर निविदा स्तरावरची कामेच थांबली असून, त्यात फारशी विलंबाची कामे नसल्यामुळे अडचण येण्याची शक्यताच नाही. रस्ते, घाट आणि पुलाची कामे कुठल्याही परिस्थितीत पुढील सात महिन्यांत पूर्ण होण्याचा विश्वास संबंधित विभागांच्या प्रमुखांनी व्यक्त केला आहे.
तीन महिन्यांत साधुग्राम,वाहनतळाची होतील कामे
साधुग्रामउभारण्यासाठी आवश्यक जागेसह अन्य सर्वच कामे पूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लागणार नाही. शिवाय, वाहनतळदेखील
आपल्याला आता लगेचच तयार करायचे नसून, ते त्याच वेळी करावे लागणार आहे. तसेच हाती घेण्यात आलेली कामे सुरूच असून, महानगरपालिकेकडे ५४ एकर जमीन उपलब्ध आहे. पुढील पंधरा दिवसांत त्यावर साधुग्रामचे कामही सुरू होणार असल्याने जागेअभावी कामे बंद आहेत, अशी अजिबात परिस्थिती अजिबात नाही.
पार्किंगसाठी कमी खर्चाच्याच जागांची निवड
सिंहस्थासाठीशहरात दाखल होणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी उभारण्यात येणाऱ्या वाहनतळाच्या जागाही कमी खर्चाच्याच निश्चित केल्या जात आहेत. जेथे खोलगट किंवा सपाट करण्यासाठी अधिक वेळ आणि पैसेही लागणार आहेत, अशा जागा आता नियोजनातून वगळण्यात आल्या आहेत. नुकतेच त्र्यंबकरोडवरील पहिने येथील वाहतळाची पाहणी केल्यानंतर पार्किंगची जागा खोलगट असल्याने हा एक सव्वा एकरचा भागही वगळण्यात आला आहे. त्याऐवजी शेजारीच पार्किंगसाठी जागा निश्चित करण्यात आली आहे.