आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आखाड्यांचे ध्वजारोहण शनिवारपासून, आखाड्यांतील चारही मढींच्या श्री महंतांच्या हस्ते होणार ध्वजपूजन आणि आरोहण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
त्र्यंबकेश्वर - सिंहस्थपर्वकाळाला २४ जुलैच्या पुरोहित संघाच्या ध्वजारोहणाने प्रारंभ झाला असला तरी शैवपंथीय आखाड्यांच्या दृष्टीने महत्त्व असणारा ध्वजारोहण सोहळा दि. १५ ते २७ आॅगस्ट या काळात होत आहे. त्र्यंबकेश्वरच्या दहाही आखाड्यांची वेगवेगळी परंपरा असल्याने हा सोहळा दि. २७ आॅगस्टपर्यंत चालणार आहे. त्यासाठी आखाड्यांची जोरदार तयारी सुरू आहे.

धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी प्रयत्नशील असणाऱ्या या आखाड्यांच्या परंपरेचे प्रतिबिंब ध्वजारोहण सोहळ्यात उमटत असते. त्यानंतरच खऱ्या अर्थाने कुंभमेळ्याला सुरुवात झाल्याचे समजले जाते. या ध्वजारोहणासाठी ५२ फुटी स्तंभ शुभ मानला जातो तो तितक्या उंचीचा असणे आवश्यकही असते. यापूर्वी त्र्यंबक तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगल असल्याने अपेक्षित लाकूड मिळण्यास अडचण नव्हती. तसेच प्रत्येक आखाड्याच्या शेतजमिनीत मोठ्या प्रमाणावर वृक्षराजी होती. त्यातून प्रमाणित उंचीचे लाकूड उपलब्ध होत असे. मात्र, वृक्षतोडीमुळे गत कुंभमेळ्यापासून वनविभागाकडून निलगिरी वृक्षाचे लाकूड प्रत्येक आखाड्याला पुरविले जाऊ लागले. या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीदेखील वनविभागाने त्यासाठी नियोजन केले आहे.

ध्वजारोहणा नंतर अन्नछत्रारंभ
काहीआखाड्यांत दोन ध्वज उभारण्याची परंपरा आहे. दशनामी संन्यासी धर्मध्वजासाठी ध्वजस्तंभ उभारणी करतात. ध्वजारोहणाप्रसंगी आखाडा परंपरेतील पुरोहित मंत्रोच्चार करतात. काही आखाड्यांची भगवी, लाल रंगाची पताका असते. त्यावर स्वस्तिक किंवा आखाड्याची इष्टदेवता आदी चिन्हे काढण्यात आलेली असतात. तर, उदासी आखाड्याच्या ध्वजपताकेवर हाताचे मारुतीचे चिन्ह असते. ध्वजारोहण त्या-त्या आखाड्यांच्या प्रमुखांच्या हस्ते विधिवत पूजेने केले जाते. महामंडलेश्वर, मंडलेश्वर, श्री महंत किंवा विशेष धर्माचार्य ही पूजा, मंत्रोच्चार आरती करतात. त्यानंतर मान्यवरांसह उपस्थितांना प्रसादाचे वाटप होते. महाप्रसादात वाफ दिलेले चणे, खाेबरे तर उदासीनमध्ये खिचडी असते. त्यानंतर अखंड अन्नछत्राला प्रारंभ होतो. ध्वज फडकत असेपर्यंत प्रवचन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम चालतात, अशी चालत आलेली परंपरा आहे.

क्षत्रियांनी सांभाळावा धर्मध्वज
पूर्वीच्या काळी परकीय आक्रमणांमुळे जर्जर झालेल्या क्षत्रिय राजांचा ध्वज आखाड्यांनी हातात शस्त्र घेऊन संरक्षित केला. त्या ध्वजाची स्थापना प्रत्येक सिंहस्थ कुंभमेळ्यात सर्व आखाडे करतात त्याचे विधिवत पूजन करतात. ध्वज उभारल्यावर आजही आखाडे आवाहन करतात की, कुणी राजा या धर्मध्वजाचे संरक्षण करण्यास समर्थ असेल त्याने हा धर्मध्वज सांभाळावा.

५२ हस्त (हात) उंची ध्वजदंडाची असते.
५२ मढ्या (मठ) एकूण आखाड्यांत आहेत.

असा ध्वज, असे ध्वजारोहण...
ध्वज लांबीचे माप हे अंगुलाच्या परिमाणात असून, प्रचलित परिमाणात ते २९ फूट इतके असून, त्याची उंची दहा फूट आहे. ध्वजपूजन आणि आरोहण हे आखाड्याच्या चारही मढींच्या श्री महंतांच्या हस्ते होत असते. ध्वजारोहणानंतरच आखाड्याच्या कुंभमेळ्याला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाल्याचे मानले जाते. आखाड्यांमधील ध्वजारोहणाचा विधी हा त्या-त्या आखाड्याच्या पुरोहितांकडे परंपरेने करण्याचा रिवाज आहे. त्या प्रयोगात विशिष्ट मंत्रोच्चार करून सर्व प्रयोग आखाड्याच्या श्री महंतांच्या अनुमतीने पुरोहित अतिशय काळजीपूर्वक करतात. या सोहळ्याला हजारो साधू उपस्थिती लावतात.

- श्री पंच दशनाम निरंजनी आखाडा दि.१५ आॅगस्ट २०१५
- श्रीपंच दशनाम आनंद आखाडा दि.१५ आॅगस्ट २०१५
- श्रीपंच दशनाम जुना आखाडा दि.१९ आॅगस्ट २०१५
- श्रीपंच दशनाम आवाहन आखाडा दि.१९ आॅगस्ट २०१५
- श्रीपंच दशनाम अग्नी आखाडा दि.१९ आॅगस्ट २०१५
- श्रीपंच दशनाम महानिर्वाणी आखाडा दि.२१ आॅगस्ट २०१५
- श्रीपंच दशनाम अटल आखाडा दि.२३ आॅगस्ट २०१५
- श्रीपंच नया उदासीन आखाडा दि.२४ आॅगस्ट २०१५
- श्रीपंच बडा उदासीन आखाडा दि.२६ आॅगस्ट २०१५
- श्रीपंच निर्मल आखाडा दि.२७ आॅगस्ट २०१५

सेवा जाहीर करण्याची प्रथा...
धर्मअन् राष्ट्ररक्षण हे एकच मध्यवर्ती ध्येय असले तरी प्रत्येक आखाड्याच्या उपासना देवता वेगवेगळ्या आहेत. त्याविषयी आपापली सेवा जाहीर करण्याची ध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी प्रथा आहे. आखाडे क्रमाक्रमाने इतर आखाड्यांतील साधू-महंतांना निमंत्रण देऊन भोजनास बोलावतात दक्षिणा देऊन त्यांचा सत्कार करतात.