आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिन्नर आगारात ‘टिंगऽऽटाँग’चे वरातीमागून घोडे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर - ‘गाडी क्रमांक 0869 फलाट क्रमांक पाचवर लागली आहे. ही गाडी संगमनेरमार्गे श्रीरामपूरला जाते’ यासारख्या उद्घोषणा सिन्नरच्या अत्याधुनिक बसस्थानकात होतात. मात्र, घोषणा होईपर्यंत किंवा त्याच्या किमान पाच मिनिटे अगोदर ही बस स्थानक सोडून मार्गस्थ झालेली असते. प्रवासी मात्र घोषणा ऐकून फलाटाकडे गाडी पकडण्यासाठी धाव घेतात. तेव्हा त्यांना गाडी केव्हाच निघून गेल्याची वार्ता समजताच आगार व्यवस्थापनाने ‘चेष्टा’ केल्याचा संताप व्यक्त होतो.
आठवड्यापासून सिन्नर बसस्थानकात रेल्वेस्थानकाप्रमाणे ‘टिंग ऽऽटॉँग’ आवाजासरशी उद्घोषणा सुविधा सुरू करण्यात आली आहे. पुणे येथील खासगी सॉफ्टवेअर कंपनीकडून बस सुटण्याची घोषणा आणि जाहिरातींसाठी स्वतंत्र संगणकीय प्रणाली (सॉफ्टवेअर) तयार करण्यात आली आहे. काही ठिकाणी केवळ आॅडियो प्रणाली आहे. सिन्नर आगाराने मात्र पुढे जाऊन आॅडियो-व्हिडियो सिस्टीमचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे गाडी सुटण्याची केवळ घोषणाच होणार नाही तर स्थानकात लावलेल्या एलसीडी पडद्यावरही ते प्रवाशांना पाहता येणार आहे.
ही प्रणाली सुरळीत नसल्याने गेल्या महिन्यातच संबंधित कंपनीला त्यात योग्य ते बदल करण्यासाठी सांगण्यात आले होते. दुरुस्तीनंतर ही यंत्रणा कार्यान्वित झाली. बस सुटण्याची घोषणा करण्याबरोबरच प्रवाशांनी बेवारस वस्तूंची आगारप्रमुखांस माहिती द्यावी, बेवारस वस्तूंना हात लावू नये, अनोळखी व्यक्तीने दिलेले खाद्यपदार्थ खावू नयेत यासारख्या अनेक प्रवासीहिताच्या घोषणा देण्याचे स्वागतार्ह काम दृकश्राव्य प्रणालींद्वारे सुरू आहे. त्या प्रवाशांसाठी फायदेशीर असल्या तरी बस सुटण्याची घोषणा मात्र बस निघून गेल्यानंतर उशिराने होत असल्याने प्रवाशांची गफलत होत आहे. फलाटावर गाडी बराच वेळ उभी असली तर ती बाहेर पडताना घोषणा होते, तर कधी गाडी फलाट सोडून गेल्यानंतर ती कुठल्या मार्गे जाते हे सांगितले जाते. बहुतेक वेळा घोषणा झालेल्या फलाटाच्या जागेवर दुसरीच गाडी उभी असते. कधी वाहतूक नियंत्रक स्वत:च्या आवाजात घोषणा करतो. त्यामुळे नेमके कुठल्या आवाजावर लक्ष केंद्रित करायचे, असा प्रश्न प्रवाशांना पडतो.
कर्मचा-यांना संगणक प्रशिक्षणाची गरज - आगारातील नियंत्रक आणि साहाय्यासाठी बसणा-या कर्मचा-यांना संगणकाबाबत पुरेसे ज्ञान नसल्याने समस्या निर्माण होत आहे. फलाटावर गाडी येताच तत्काळ क्रमांक टाकून संगणकीय भाषेत एंटर दिल्यास विहित वेळेत घोषणा होते. मात्र, तेच काम उशिराने झाल्यास घोषणा उशिराच होईल. त्यासाठी कर्मचा-यांनी संगणक यंत्रणेची नीट माहिती करून घेणे गरजेचे आहे. - सुनील चव्हाण, सॉफ्टवेअर इंजिनिअर