सिन्नर - भरधाव वेगात कट मारून पुढे जाणार्या बोलेरो वाहनाचा रागाच्या भरात केलेला पाठलाग दुचाकीस्वारांच्या जिवावर बेतला. रात्री 9 च्या सुमारास कठड्यावर धडकलेली दुचाकी विहिरीत कोसळल्याने पांडुरंग किसन आव्हाड (40) व अनिल तानाजी नागरे (33, रा. दोडी) हे दोघेजण ठार झाले.
नाशिक-पुणे महामार्गावरील दोडी गावाजवळ बोलेरो व इनोव्हा वाहन चालकांचा वाद झाला. पांडुरंग आव्हाड व अनिल नागरे या दुचाकीस्वारांनाही बोलेरो चालकाचा राग आल्याने जाब विचारण्यासाठी त्यांनी दुचाकीवरून गाडीचा पाठलाग सुरू केला. तो चुकवण्यासाठी बोलेरो चालकाने रस्ता बदलून खंबाळे रस्त्यावर गाडी नेली. त्यांना पकडण्यासाठी दुचाकीस्वाराने मधला कच्चा रस्ता निवडला. रस्त्याच्या कडेला असलेली एका शेतातील विहिर अंधारात लक्षात न आल्याने कठड्यावर धडकून हे दोघेजण दुचाकीसह सुमारे 35 फूट खोल विहिरीत कोसळले.
अपघाताचा आवाज ऐकून शेतकरी त्यांच्या मदतीला धावले. विहिरीत उतरुन बाजेच्या सहाय्याने दोघांना बाहेर काढण्यात आले.पैकी पांडुरंग आव्हाड जागीच ठार झाला. तर अनिल नागरे गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी नाशिकला घेऊनजात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.