आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवेनेचे संकेतस्थळ आता आकर्षक स्वरूपात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड-सोशल नेटवर्किंग साइटच्या वाढत्या लोकप्रियतेचा फायदा विविध राजकीय पक्षांकडून उठविला जात आहे. आगामी निवडणुकीत तरुण मतदारांचा कौल निर्णायक ठरणार असल्याने त्यांना आकर्षित करण्यासाठी शिवसेनेने नवीन स्वरूपात संकेतस्थळ सुरू केले आहे. या अद्ययावत संकेतस्थळाच्या माध्यमातून तरुण मतदार जोडण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे.
शिवसेनेच्या पूर्वीच्या संकेतस्थळात आमुलाग्र बदलांबरोबरच ते अधिक आकर्षक करण्यात आले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ‘फटकारे’, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे ‘महाराष्ट्र देशा’ ही पुस्तके, तसेच पक्षांची विस्तृत माहिती त्यात समाविष्ट केली आहेत. शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीदिनी पक्षातर्फे झालेल्या शिवबंधन व प्रतिज्ञा कार्यक्रमाचा समावेश संकेतस्थळात केला आहे. शिवसेना-भाजप युतीच्या कार्यकाळात झालेल्या विकासकामांची सचित्र माहिती त्यात आहे. तरुण मतदार पक्षाकडे आकर्षित होण्यासाठी शिवसेनाप्रमुखांचे प्रखर विचार, स्लोगनचादेखील वापर केलेला आहे.
‘शिवसेना पक्ष’ या कॉलममध्ये पक्षाची स्थापना व उद्दिष्टे, ध्येय व धोरणे, प्रतिज्ञादिन सभा, शिवसैनिकांसाठी शिवबंधन प्रतिज्ञा, शिवबंधन, शिवसेनेचा पहिला मेळावा, शिवशाहीचा सुवर्णकाळ , करून दाखवलं, याशिवाय शिवसेना नेते, उपनेते, लोकसभा, राज्यसभा सदस्य, आमदार व नगरसेवक, महापालिका, जिल्हा परिषद यांच्या सविस्तर माहितीचा समावेश आहे. भारतीय कामगार सेना, स्थानिय लोकाधिकार समिती, दैनिक सामना व साप्ताहिक मार्मिकची माहिती दिली आहे. युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांचे मनोगत व युवा सेनेविषयीच्या सर्वंकष माहितीचाही त्यात समावेश आहे.
अविस्मरणीय भाषणे
संकेतस्थळावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निवडक अविस्मरणीय भाषणांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यात माणसाला जात नको, माणुसकी हवी, प्रबोधनकार ठाकरे हेच माझे सर्वस्व, भगव्याचे मोहोळ उठवा, उठा सज्ज व्हा, भगव्याचे तेज इतर कोणत्या झेंड्यात आहे? आदी भाषणांचा समावेश आहे.
विविधांगी संकेतस्थळ
पक्षाचे संकेतस्थळ अद्ययावत करताना त्यात शिवसेनाप्रमुख, पक्षप्रमुखांच्या प्रकाशित पुस्तकांचा समावेश केला आहे. युवा सेनेचे संकेतस्थळदेखील त्याला जोडलेले आहे. शिवसेनाप्रमुखांच्या निवडक भाषणांच्या समावेशासह उच्च दर्जाच्या छायाचित्रेदेखील संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. हर्षल प्रधान, संपादक
वेध निवडणुकीचे