आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक - ‘ट्राय’ने कॅफ अर्ज भरून देण्यासाठी 15 डिसेंबर ही अखेरची दिलेली मुदत टळूनही ग्राहकांनी स्थानिक केबलचालकांकडे आणि केबलचालकांनी मल्टिसिस्टिम ऑपरेटरकडे कॅफ अर्ज सादर केले नाहीत. त्यामुळे नाशकात रविवारी जवळपास सहा हजार केबल जोडण्या बंद करण्यात आल्या. त्यात डेन आणि हाथवे या दोन्ही केबल कंपन्यांच्या प्रत्येकी तीन हजार जोडण्यांचा समावेश आहे.
केबल करामधील अनियमितता रोखण्यासाठी ट्रायने सर्वच ग्राहकांकडून कॅफ अर्ज भरून घेण्याचे आदेश दिले होते. मात्र, केबलचालकांनी जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केल्याने त्यास वारंवार मुदतवाढ द्यावी लागली. अखेर आता ग्राहकांचे केबल कनेक्शन बंद केल्यानंतर कॅफ अर्ज भरून देण्याचे प्रमाण वाढले आहे. डेन कंपनीच्या डेन एनसीसीएन आणि पीसीसीएन या दोन्ही कंपन्यांचे मिळून तीन दिवसांपूर्वी तीन हजार ग्राहकांचे कनेक्शन या अर्जांअभावी बंद करण्यात आले होते.
डेनकडे तीन दिवसांत बाराशे अर्ज : केबल बंद होताच डेन कंपनीच्या ग्राहकांनी स्थानिक केबलचालकांकडे तीनच दिवसांत बाराशे अर्ज भरून दिले, तर हाथवे कंपनीचे जवळपास 25 हजार कनेक्शन असून, त्यातील तीन हजार ग्राहकांचे कनेक्शन बंद करण्यात आले आहे. हाथवेच्या ग्राहकांना केवळ दूरदर्शनचेच चॅनल्स दिसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. लवकर अर्ज भरून न दिल्यास कनेक्शन बंद करण्याचेही कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे.
केबलचालकांकडे अर्जाची मागणी करा : केबल कनेक्शनची संख्या समोर येऊ नये म्हणून काही केबलचालक अर्ज भरून देण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे ग्राहकांनीच आता कनेक्शन सुरू ठेवण्यासाठी केबलचालकांकडे अर्जांची मागणी करावी. त्यात आपले नाव, पत्ता तसेच आपल्या सेट टॉप बॉक्सचा नंबर टाकावा. फोटो ओळखपत्रही जोडावे.
प्रतिज्ञापत्राच्या आदेशावर आज सुनावणी
केबलचा वाद जवळपास मिटण्याचे स्पष्ट झाल्यानंतरही केबलचालकांनी संयुक्त प्रतिज्ञापत्राच्या विरोधात दाखल केलेल्या अपिलावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी आहे. 19 ऑक्टोबर रोजी एमएसओ आणि केबलचालक यांना संयुक्त प्रतिज्ञापत्र देण्याची शासनाने सक्ती केली होती. त्याविरोधात मुंबईतील महाराष्ट्र केबल ऑपरेटर फेडरेशन या संघटनेने दाखल केलेल्या तक्रारीवर आज निर्णय होण्याची शक्यता आहे.
एमएसओ करतील मनमानी
आज शासनाचा दबाब वाढत आहे म्हणून एमएसओ सहज संयुक्त प्रतिज्ञापत्रास राजी होत आहेत. उद्या मात्र ही स्थिती राहणार नाही. दर महिन्याचे प्रतिज्ञापत्र देताना केबल कंपन्या केबलचालकांवर मनमानी करू शकतात. अनिल खरे, एलसीओ
केवळ दूरदर्शन सुरू
25 टक्के ग्राहकांनी अर्ज दिले नाहीत. त्यांचे केबल कनेक्शन बंद केले आहे. केवळ दूरदर्शनचेच चॅनल्स सुरू आहेत. ग्राहकांनी त्वरित अर्ज केबलचालकांकडे भरून द्यावेत. दिलीप सानप, एमएसओ, हाथवे कंपनी
अंतिम मुदतीनंतरही सूट दिली होती
आम्ही ग्राहकांना अंतिम मुदतीनंतरही सूट दिली होती. मात्र, ते अद्यापही अर्ज भरून देत नसल्यानेच अखेर ट्रायच्या आदेशाने केबल कनेक्शन बंद करावे लागले. अर्ज भरून दिल्यास त्वरित कनेक्शन सुरू केले जाते. बाराशे ग्राहकांनी अर्जही भरून दिले आहेत. त्यांचे कनेक्शन तत्काळ सुरू केले जाईल. रोहित आरोळे, एमएसओ, डेन कंपनी
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.