आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सारडा सर्कलवर साकारणार पहिला ‘रोप स्काय वॉक’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरातील प्रमुख चौकांपैकी एक असलेल्या सारडा सर्कल चौकातील वाढती रहदारी बघता येथे मुंबईच्या धर्तीवर शहरातील पहिलाच ‘स्काय वॉक’ उभारण्यात येणार आहे. यासाठी अंदाज पत्रकात 5 कोटी रुपयांची तरतूददेखील करण्यात आली आहे.

सारडा सर्कलवर चोहोबाजूंनी होणारी वाहतूक कोंडी आणि हाकेच्या अंतरावर असलेल्या नॅशनल उर्दू शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी, तसेच पादचा-यांची होणारी गैरसोय ही दिवसेंदिवस वाढत जाणारी समस्या होती. याठिकाणी विविध राज्यातून येणा-या भाविकांसाठी त्र्यंबकेश्वर व शिर्डी येथे दर्शनासाठी जाणारी वाहने तसेच मालेगाव, धुळे व इंदोरकडे जाणारी आणि अहमदनगर, पुण्याच्या दिशेने जाणा-या लांबपल्ल्याच्या बसेसची रात्रं-दिवस वर्दळ सुरू असते. त्याचप्रमाणे इतर मालवाहू वाहने, दुचाकी, कारचालकांना याच चौकातून मार्गक्रमण करावे लागते. परिणामी, अनेक जणांना या चौकात रस्ता ओलांडताना अपघाती मृत्यूही आला आहे. अनेक जण गंभीर जखमीदेखील झालेआहेत. महिला आणि विद्यार्थ्यांची तर रस्ता ओलांडताना सर्वाधिक गैरसोय होत असते.

या पार्श्वभूमीवर धोकेदायक ठरू पाहणा-या या चौकात ‘स्काय वॉक’ उभारण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत होती. दरम्यान, 2011 मध्ये तत्कालीन नगरसेवकांनी या ‘स्काय वॉक’साठी मंजुरीही मिळवली होती, या कामाचे भूमिपूजनही झाले होते. मात्र, काही कारणास्तव हे काम थांबून याबाबतचे प्रकरण न्यायालयात गेले होते. याप्रकरणी न्यायालयीन निकाल महापालिकेच्या बाजूने लागल्यावर ‘स्काय वॉक’ची तरतूद महासभा व स्थायी समितीच्या अंदाजपत्रकात करण्यात आली. विशेष म्हणजे, याकामी लवरच निविदा काढण्यात येणार आहे आणि यासाठी पाच कोटींची तरतूद असल्याची माहिती नगरसेवक गुलजार कोकणी यांनी दिली आहे.

अपघातसंख्या घटणार...
शहरातील अत्यंत वर्दळीचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे सारडा सर्कल अपघातप्रवण क्षेत्र म्हणूनदेखील ओळखले जाऊ लागले आहे. याठिकाणी दररोज ये-जा करणा-या विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना रस्ता ओलांडताना मोठा धोका पत्करावा लागतो आहे. ‘रोप स्काय वॉक’मुळे मात्र याठिकाणी होणारी अपघात संख्या
निश्चितच घटणार आहे.
गुलजार कोकणी, नगरसेवक

विद्यार्थ्यांचा धोका टळणार...
नॅशनल उर्दू शाळेत शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांमध्ये जुने नाशिक भागातील विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. सारडा सर्कल परिसरातून रोज हजारो वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना धोक्याचे ठरते. ‘स्काय वॉक’ साकार झाल्यास विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना धोका पत्करावा लागणार नाही.
प्रा. डॉ. नूर-ए-इलाही शाह, उपप्रचार्य,नॅशनल उर्दू महाविद्यालय

मुंबईच्या धर्तीवर प्रयोग
मुंबईच्या धर्तीवर शहरात साकार होणा-या या पहिल्याच ‘रोप स्काय वॉक’चा आकार ‘वाय’सारखा असेल. दूधबाजार व फाळकेरोड येथून नॅशनल शाळेकडे जाणा-या नागरिकांसाठी फाळकेरोड ते नॅशनल शाळा असा मार्ग असेल. तसेच, चौक मंडई, बागवानपुरा, कोकणीपुरा भागातून येणा-या नागरिकांसाठी जहाँगीर कब्रस्तान ते नॅशनल शाळा असा मार्ग असेल.