आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

..अन् विद्यार्थ्यांचे स्वप्न झाले साकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - ‘शाळेच्या कोपर्‍यात ठेवलेला संगणक संच खिडकीतून लपून-छपून बघायचा आणि संगणक प्रत्यक्ष हाताळण्याचे स्वप्नात रममाण व्हायचे’, असा नित्यक्रम असलेल्या अंबड झोपडपट्टीतील निराधार स्वावलंबन समितीच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांचे स्वप्न जैनम् ग्रुपने साकार केले. हे संगणक संच सुरू केल्यावर त्यावर गीत ऐकू येताच विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर हसू फुलले. ‘जॉय ऑफ गिव्हिंग’ उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देत उद्योजक संजय लोढा व त्यांच्या सहकार्‍यांनी विद्यार्थ्यांना हे संगणक संच उपलब्ध करून दिले.

अंबड औद्योगिक वसाहतीतील झोपडपट्टीत राहणार्‍या, मजुरी, सुरक्षारक्षकाचे काम करणार्‍यांच्या मुलांना घरी जाऊन बोलावून घेत शिक्षण देण्याचा वसा स्वीकारलेल्या निराधार स्वावलंबन समितीकडून नूतन प्राथमिक विद्यामंदिर सुरू करण्यात आले आहे. समितीच्या संचालिका के. आर. बुरकुले, सचिव एस. डी. कर्पे यांनी दानशुरांच्या मदतीने छोट्याशा जागेत ही शाळा उभी केली आहे. या विद्यार्थ्यांना संगणकाचे शिक्षण मिळून त्यांचे उज्ज्वल भवितव्य घडविण्यासाठी जैनम् ग्रुपने त्यांना संगणक संच उपलब्ध करून दिला. या प्रसंगी उद्योजक लोढा, बांधकाम व्यावसायिक अविनाश शिरोडे, अभय तातेड व ‘दिव्य मराठी’चे ब्युरो चीफ अभिजित कुलकर्णी उपस्थित होते.

उद्योजकांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद
जैनम् ग्रुपच्या लोढा, तातेड व शिरोडे या तिन्ही उद्योजकांनी नूतन विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांना संगणक संच प्रत्यक्ष सुरू करून देत त्यांना ते हाताळण्यास सांगितले. त्यांच्याशी संवाद साधताना तिघेही उद्योजक भावूक झाले होते. या वेळी त्यांनी ‘आम्हीही तुमच्यासारखेच छोट्याशा आणि ग्रामीण भागातील जिल्हा परिषद, नगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकलो, संघर्षमय व खडतर प्रवास करून यशस्वी झालो असून, तुम्हीही सतत अभ्यास आणि संगणकाचा सराव केल्यास निश्चितच यशस्वी व्हाल’, असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.