आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Small And Medium Industries Competition Issue At Nashik

नाशिकमध्‍ये ‘डिझायनिंग क्लिनिक’ ठरणार उद्योगांना वरदान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- केंद्र सरकारकडून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना स्पर्धेच्या युगात अधिक सक्षमतेने उभे राहता यावे आणि त्याकरिता त्यांचे उत्पादन विकसित करण्यासाठी मदत व्हावी, या उद्देशाने ‘डिझायनिंग क्लिनिक’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील उद्योगांकरिता अंबड येथील नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरमध्ये हे ‘डिझायनिंग क्लिनिक’ सुरू होत आहे. त्यासाठी केंद्र शासनाने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन, अहमदाबादची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली आहे.

लघु, मध्यम किंवा सूक्ष्म उद्योगांना स्पर्धेच्या युगात त्यांच्या सध्याच्या किंवा नव्या उत्पादनाचे डिझाइन, मार्केटिंग तंत्रज्ञान या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. ही सर्व प्रक्रिया राबवायची म्हटली तर त्याकरिता बॅँकेकडून आर्थिक, तर खासगी एजन्सीकडून उत्पादन डिझाइन, विकास आणि ब्रॅँडिंगकरिता मदत घ्यावी लागते, जी खर्चिक असते.

नव्याने सुरू होत असलेल्या डिझायनिंग क्लिनिकमुळे ही सुविधा एकाच छताखाली आणि शासनाच्या मदतीने उपलब्ध होणार आहे. त्यासाठी एकूण प्रकल्पाच्या 10 ते 15 टक्के खर्च उद्योगांना करावा लागणार असून, 80 टक्के खर्चाची बचत शक्य होणार आहे. शासनाकडून त्याकरिता निधीही उपलब्ध होऊ शकणार आहे.

यामुळे या क्लिनिकमध्ये उद्योगांना आपली उत्पादने, ती विकसित करण्यासाठीची प्रक्रिया, ती विकसित करतानाचा सुसंवाद, उद्योगांची आर्थिक स्थिती, उत्पादनाचे पॅकेजिंग यांसारख्या सुविधा उपलब्ध असतील. याचा फायदा जिल्ह्यातील उद्योगांना त्यांच्या उत्पादनाची गुणवत्ता वाढविण्यासाठी होणार आहे.

आंतरराष्ट्रीय सुविधांचा फायदा
नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरची भूमिका या उपक्रमात महत्त्वाची असून, क्लस्टरमधील आंतरराष्ट्रीय सुविधांचा उपयोग होणार आहे. यासाठी केंद्र शासनाने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन, अहमदाबादची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली आहे. हर्षवर्धन गुणे, सीईओ, नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर

फेब्रुवारीपासून कार्यान्वित
डिझायनिंग अवेअरनेस या कार्यक्रमास 28 फेब्रुवारीपासून इंजिनिअरिंग क्लस्टरमध्ये सुरुवात होणार आहे. त्यासाठी उद्योगांना आपले प्रस्ताव या कार्यालयात सादर करावे लागणार आहेत. त्यांची छाननी केल्यानंतर निवडलेल्या उद्योगांनाच या उपक्रमात सहभागी करून घेतले जाणार आहे. या उपक्रमात डिझाइन अवेअरनेस सेमिनार, डिझाइन अवेअरनेस प्रोग्राम, डिझाइन प्रोग्राम यांची माहिती उद्योगांना दिली जाणार आहे.