नाशिक - लघुउद्योगांची देशव्यापी संघटना असलेल्या लघुउद्योग भारतीचे राज्यस्तरीय अधिवेशन २२ मे रोजी यंदा नाशिकमध्ये होणार असून, उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल.
गंगापूर रोडवरील नक्षत्र होलमध्ये होणारे हे संघटनेचे ९७वे अधिवेशन आहे. यापूर्वी २००४-०५ मध्ये अधिवेशनाच्या आयोजनाचा मान नाशिकला मिळाला होता. यंदाच्या अधिवेशनास राज्यातील दोनशे लघुउद्योजक उपस्थित राहणार असून, ‘मेक इन इंडिया’ आणि ‘मेक इन महाराष्ट्र’ या विषयावर मुख्यमंत्री फडणवीस मार्गदर्शन करणार आहेत. एकत्रित करप्रणालीचाही ऊहापोह या अधिवेशनातून होणार आहे. गृह उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे, संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी भूषण वैद्य, ओमप्रकाश मित्तल यांच्यासह अन्य पदाधिकार्यांची अधिवेशनास उपस्थिती असेल.
सूक्ष्म लघुउद्योगांसाठी स्वतंत्र खात्याची मागणी
मोठे उद्योग आणि सूक्ष्म लघु उद्योगांचे प्रश्न वेगवेगळे असल्याने उद्योगमंत्र्यां व्यतिरिक्त सूक्ष्म लघु उद्योगांसाठी राज्यात स्वतंत्र खाते मंत्री नियुक्त करण्याची मागणी अधिवेशनात केली जाणार आहे. केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य शासनानेही असे पाऊल उचलावे, अशी लघुउद्योजकांची मागणी असून, कमीत कमी भांडवलात सर्वाधिक रोजगार निर्मिती करणार्या लघुउद्योगांपुढील अडचणी त्या सोडविण्यासाठीचे उपाय याबाबत अधिवेशनात विचारविनिमय होणार आहे.