आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिक शहर: समस्या छोटी, प्रशासनाची उदासीनता मोठी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुने नाशिक - बंद असलेला रॅम्प (जंर) आणि अस्वच्छतेतही टारगटांचा अड्डा झालेल्या भुयारी मार्गाने द्वारका परिसरातील वाहतुकीची कोंडी अधिक वाढविली आहे. विशेष म्हणजे, या समस्यांची सोडवणुक करणे ही प्रशासनाच्या दृष्टीने ‘बाये हात का खेल’ असले तरीही त्यासाठी प्रयत्नच केले जात नसल्यामुळे वाहनचालकांना येथून अक्षरश: जीव मुठीत धरून वाहने हाकावी लागतात.

अनधिकृत टपर्‍या
द्वारका परिसरातील उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागी अनधिकृत हातगाड्या उभ्या आहेत. रात्री या ठिकाणी मद्यपानही होते. मात्र, पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे.

भुयारी मार्गात अस्वच्छता
द्वारका येथील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी तसेच पादचार्‍यांसाठी नुकताच भुयारी मार्ग सुरू करण्यात आला. सुरुवातीला नागरिकांनी या भुयारी मार्गाचा वापर केलादेखील; मात्र येथे स्वच्छताच होत नसल्याने आता हा मार्ग शोभेची वस्तू झाला आहे. आता भुयारी मार्गात मोठय़ा प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे पादचार्‍यांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणी बसविण्यात आलेल्या दिव्यांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. तसेच, प्रवेशद्वारासमोरच रिक्षा उभ्या राहत असल्याने पादचार्‍यांना भुयारी मार्गात ये-जा करताना गैरसोयींचा सामना करावा लागतो. याकडेही संबंधितांनी डोळेझाक केली आहे.

उनाड मुलांचे वास्तव्य
भुयारी मार्गात दुपारी आणि सायंकाळच्या सुमारास परिसरातील मुले सर्रासपणे क्रिकेट खेळताना दिसतात. त्याचप्रमाणे या भागात काही उनाड मुलांचेही वास्तव्य असते. त्यामुळे महिलावर्ग येथून मार्गक्रमण करण्यास पसंती देत नाही. गॅरेजमध्ये काम करणारे कारागिरही या मार्गात बिनधास्तपणे वामकुक्षी करतात. भुयारी मार्गात पोलिसाची नियुक्ती केल्यास या समस्यांची तीव्रता कमी होईल, असे बोलले जाते.


सूचना कळवा
विकासाचे पुढचे पाऊल टाकण्यासाठी उड्डाणपुलाने महत्त्वाची भूमिका बजावली असली तरीही काही तांत्रिक दोषांमुळे हा पूल सध्या जीवघेणा ठरत आहे. हा पूल काही ठिकाणी अनावश्यकरीत्या उतरविण्यात आल्याने पादचार्‍यांना रस्ता ओलांडण्याशिवाय पर्याय नाही आणि त्यातूनच अपघात घडतात. त्याचप्रमाणे अंडरपासची अपुरी संख्या, रस्त्यावर काळ्या-पिवळ्या पट्टय़ांचा अभाव, सिग्नल नाही या आणि अशा अनेक त्रुटी अजूनही असल्याने त्यामुळे वाहतुकीला मोठा खोळंबा होतो. या पुलामुळे निर्माण झालेल्या अडचणी आणि त्या सोडविण्यासाठी उपाययोजना याविषयी आपणास काही सांगावयाचे असल्यास 9975547616 किंवा 9420409131 या क्रमांकावर संपर्क साधावा. त्यातील निवडक सूचनांना प्रसिद्धी दिली जाईल.


जीव मुठीत..
उड्डाणपुलाला जोडलेला रॅम्प बंद केल्यामुळे वाहतूक खालून सुरू आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होतच आहे. पादचार्‍यांना जीव मुठीत धरावा लागतो. भुयारी मार्गातील अस्वच्छतेमुळे त्याकडे पाठच फिरवली आहे. भूषण विसपुते, रहिवासी


वाहतूक सुरू करावी
उड्डाणपुलावरील बंद असलेली वाहतूक पुन्हा सुरू करावी. हा पूल वाहतुकीस बंद असल्याने चौकात मोठय़ा प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे चौक ओलांडून जाण्यास अधिक वेळ लागतो. सागर राजपूत, वाहनधारक


वादाचे ठिकाण
उड्डाणपुलालगत मोठय़ा प्रमाणावर प्रवासी वाहने उभी राहत असतात. त्यामुळे वाहनधारकांमध्येच वाद निर्माण होत असतात. याचा फटका मात्र प्रवाशांना बसतो. येथे वाहतूक नियंत्रक कायमस्वरूपी असण्याची गरज आहे. सचिन कर्डिले, रहिवासी